मंत्रालयातील उपसचिवाला मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेल्या आमदार बच्चू कडू यांना गुरुवारी जामीन मिळाला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना महानगर दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला असून त्यांना पारपत्रही जमा करण्यास सांगितले आहे.
अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मरिन ड्राइव्ह पोलिसांनी बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विधान भवनातून बाहेर पडल्यानंतर अटक केली होती. कडू हे लिपिक अशोक जाधव यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव बी. आर. गावित यांना भेटायला गेले होते. जाधव यांना सरकारी निवासस्थानात राहू देण्याची विनंती करण्यासाठी ते गेले होते; परंतु कडू आणि गावित यांच्यामध्ये वादावादी झाली, त्यातच कडू आणि जाधव यांनी गावित यांना मारहाण केली. याचा निषेध करत मंत्रालय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. बुधवारी रात्री पोलिसांनी कडू यांना अटक केल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांना महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मारहाणीत आरोपी असलेल्या जाधवला अजूनही अटक झालेली नाही.