मुंबई : देशभरात अन्न प्रक्रिया उद्योग आता मोठय़ा प्रमाणावर विस्तारतो आहे, मात्र या उद्योगाचे नेमके स्वरूप, त्यासाठी शेतक ऱ्यांकडून कोणत्या प्रकारचा आणि दर्जाचा कच्चा माल लागणार आहे, त्या मालाच्या बदल्यात मिळणारा हमी भाव आणि या उद्योगासाठी लागणारे तंत्रज्ञान-बाजारपेठ या सगळ्याबद्दल शेतकरी अजूनही अनभिज्ञ आहे. वेगवेगळ्या प्रकारे अन्न प्रक्रिया उद्योगात सहभागी होऊन शेतक ऱ्यांना कशा प्रकारे आर्थिक कमाई करता येईल, याबद्दलचे शिक्षण त्यांना देणे गरजेचे आहे, असे मत ‘अन्न प्रक्रिया उद्योग’ विषयावरील परिसंवादात सहभागी वक्त्यांनी लक्ष वेधले.

अन्न प्रक्रिया उद्योगावरील परिसंवादात हिल झिल रिसॉर्ट अँड वायनरीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत सावे, वरुण अ‍ॅग्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा धात्रक, केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्यक संचालक लक्ष्मी राव यांनी सहभाग घेतला. या क्षेत्रातील व्यावसायिकांना लागणाऱ्या विविध सरकारी परवानग्या, करसवलती, कमीत कमी किमतीत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची सोय अशा अडचणी दूर करण्यात सरकारी स्तरावर मदत मिळाली पाहिजे, याकडे अन्न प्रक्रिया उद्योग विस्तारासाठी ‘क्लस्टर इकॉनॉमी’ पद्धत महत्त्वाची असून शेतक ऱ्यांनी ती समजून घ्यायला हवी, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले.

वायनरीसाठी मोठय़ा प्रमाणावर फळे लागतात. हे कोणा एकाचे काम नाही. त्यासाठी काही शेतक ऱ्यांनी एकत्रितरीत्या पिक घेऊन मिळालेल्या उत्पादनावर पुढील सर्व प्रक्रिया करत आर्थिक नफा कमावणे म्हणजे क्लस्टर इकॉनॉमी होय. यामुळे एकाच उत्पादनातून इतर उपउत्पादनांची निर्मिती करून त्यांना अधिक नफा मिळू शकतो, असे मत हिल झिल रिसॉर्ट अँड वायनरीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत सावे यांनी व्यक्त केले, तर प्रत्येक अन्न प्रक्रिया उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या गरजा वेगवेगळ्या असतात, त्या पद्धतीचे उत्पादन शेतक ऱ्यांनी घेतले तरच त्यांच्या मालाला उत्तम भाव मिळतो, अशी माहिती वरुण अ‍ॅग्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा धात्रक यांनी दिली.

मधुमक्षिका पालन हा आजवर जोडधंदा समजला जात होता. मात्र मधुमक्षिका पालनातून केवळ मधनिर्मिती हा उद्देश राहिलेला नाही. तर मधमाशांमुळे वेगाने परागीकरण होऊन शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होत असल्याने दर हेक्टरी शेतक ऱ्यांनी कमीत कमी दोन मधमाशांच्या पेटय़ा ठेवणे गरजेचे आहे. या प्रकारच्या शेतीला ‘स्वीट रिव्हल्यूशन’ असे नाव देण्यात आले असून कुठल्याही भांडवलाविना, योग्य प्रशिक्षण घेऊन चांगले उत्पन्न मिळवून देणारा हा उद्योग आता मुख्य व्यवसाय मानला जात असल्याचे लक्ष्मी राव यांनी सांगितले. अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात ज्याचा जसा उद्योग तशा त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. या उद्योगांची आणि त्यांच्या गरजांची माहिती रेडिओ, टेलीव्हिजन, समाजमाध्यमे आणि जनजागृती उपक्रमांतून जास्तीत जास्त शेतक ऱ्यांपर्यंत पोहोचली तर त्यांचा यातला सहभाग वाढेल, याकडेही या वक्त्यांनी लक्ष वेधले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’च्या शैलजा तिवले यांनी केले.