पालघर पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी प्रशासनाला हाताला धरून मुद्दामहून इव्हीएम बंद ठेवल्या असून इथले मतदान आम्हाला होऊ नये असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

अनेक सोसायटींमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोन करून नागरिकांना अमिष दाखवत आहेत. काही भागात पेट्रोल एक रूपयांनी स्वस्त विकले जात आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. माध्यम प्रतिनिधींचे फोन गेल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. प्रशासनाला हाताला धरून भाजपा रडीचा डाव खेळत आहे. मध्यरात्री अधिकारी मशीनमध्ये कसले सेटिंग करत होते, असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला.

जिथे जिथे बविआचे प्राबल्य आहे. तिथे मशीन्स बंद ठेवण्यात आले आहेत. मतदार वाट पाहून जात आहेत. या निवडणुकीत भाजपाने सेटिंग केले आहे, असा आरोप करत आमची लढत ही भाजपा नव्हे तर शिवसेनेबरोबर असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

पालघरमध्ये आज भाजपा खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होत आहे. येथील मुख्य लढत ही शिवसेना-भाजपा आणि बहुजन विकास आघाडीमध्ये होत आहे.