भाजप-सेनेचे परस्परविरोधी दावे

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठीच्या न्यासामध्ये स्थान मिळावे, अशी भारतीय जनता पक्ष, तसेच शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांची इच्छा होती. मात्र ती फलद्रुप न झालेल्या नेत्यांमध्ये नाराजीची भावना असून, इच्छुकांच्या नावांवर फुली मारण्यामागे नेमका कुणाचा हात आहे, यावरून दोन्ही पक्ष परस्परविरोधी दावे करीत आहेत.

संबंधित स्मारक न्यासाच्या मोजक्या विश्वस्तांच्या यादीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंतिम स्वरूप दिले आहे. या न्यासात कुठल्या नेत्यांना स्थान द्यावे, या प्रश्नावरून गेले सहा महिने विश्वस्तांची यादी रखडली होती. या न्यासाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे यांचा न्यासात समावेश आहे. सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ िशदे आदी शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी आणि सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी कोणाचा समावेश यात करावा, याविषयी पेच होता. आता शिवसेनेचे केवळ सुभाष देसाई यांना न्यासामध्ये विश्वस्त म्हणून घेतले जाणार आहे. शिवसेनेतील अनेक इच्छुक नेत्यांची नावे गाळून न्यासात भाजपच्या नेत्यांच्या समावेशासाठी मुख्यमंत्र्यांनी केला असता उद्धव ठाकरे यांनी त्यास विरोध केला, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. तर, भाजपने मात्र हा आरोप फेटाळला आहे. महापौर बंगल्यात उभारले जाणारे हे स्मारक म्हणजे दुसरे शिवसेनाभवन होऊ नये, न्यासावर शिवसेनेचा वरचष्मा राहू नये, याची काळजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे, असे बोलले जाते. तर, न्यासात शिवसेना नेत्यांपेक्षा अधिकारी अधिक आहेत, अशी सेनेतील काही नेत्यांची भावना आहे. भाजपकडून खासदार पूनम महाजन यांचे नाव मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुचविले व त्यास उद्धव ठाकरे यांनी संमती दिली. मात्र अन्य कुठल्याही भाजप वा शिवसेना नेत्यांचा समावेश न्यासात केला जाणार नाही, असे दोन्ही पक्षांतील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

प्रख्यात वास्तुविशारद शशी प्रभू हे न्यासाचे विश्वस्त असतील व स्मारकासाठीचा आराखडा तयार करतील.  मुख्य सचिव, महापालिका आयुक्त, नगरविकास विभागाचे सचिव आणि दैनंदिन देखभाल व अन्य मदतीसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा व अभियंत्यांचा समावेश न्यासामध्ये राहील. विश्वस्तांची औपचारिक घोषणा काही दिवसांत करून नोंदणी केली जाईल.