सध्या देशात केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून राजकीय वातवारण तापलेलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने देखील हे कायदे रद्द करण्याची मागणी करत, काल नागपुरात विधीमंडळास घेराव देत आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला आजा भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. “बाळासाहेब थोरातांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही” असं भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

“मागच्या पाच-सात वर्षात राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आडगळीला पडला होता. अपघाताने महाआघाडीच्या पाठीमागे उभा राहुन सत्तेत आला. एका वर्षात राज्यातील शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न निर्माण झाले. त्यासाठी सरकार अपयशी ठरलं असुन, मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता आली नाही. खरीपाचा विमा मिळालेला नाही. सोयाबीन निकृष्ट उगवले. हे सारे प्रश्न असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात केंद्रात सुरू असलेल्या कृषी कायद्याचा आधार घेवून भाजपावर टीका करतात हे हास्यास्पद आहे. खरं तर त्यांच्या नैतिक अधिकार नाही, कारण राज्यात शेतकरी खितपत ठेवला आणि आता मोर्चा काढून राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी ही मंडळी कृषी कायद्यात पराचा कावळा करत ओरडत आहेत.” अशी टीका राम कुलकर्णी यांनी केली आहे.

“पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेत, आता ते शेतकऱ्यांना गुलाम बनवायला निघालेत”

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नागपुरात जावून काल भाजपावर केलेली टीका म्हणजे बालीशपणाच होय. कारण, राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थोरत एक शब्दही बोलत नाहीत आणि कृषी कायद्यावर मात्र छाती फाडून बोलतात. यावरूनच शेतकऱ्यांविषयी किती नाटकी कळवळा सुरू आहे? हे लक्षात येतं. शिवसेना, राष्ट्रवादी व इतर सत्ताधारी नेते शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका करतात. मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत?” असा प्रश्न देखील भाजपाकडून विचारण्यात आला आहे.

तसेच, दिल्लीतील आंदोलन काँग्रेसची राजकीय खेळी असुन खरा शेतकरी यामध्ये सहभागी झालेला नाही. तरी सुद्धा केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी अशा आंदोलनाला फुस लावण्याचं काम काँग्रेस नेते करतात. राज्यात स्वाभिमानाने शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे नेते आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. यावर कोणताही शेतकरी नेता शिट्टी वाजवायला का तयार नाही? असा सवाल जनता विचारीत असल्याचंही भाजपा प्रवक्त राम कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.