News Flash

पत्नीला वंध्यत्वावरून हिणवणे ही क्रूरताच!

पत्नीला वंध्यत्वावरून सतत हिणवणे ही पराकोटीची क्रूरताच आहे, असे स्पष्ट करीत वांद्रे कुटुंब न्यायालयाने ५१ वर्षांच्या महिलेला घटस्फोट मंजूर केला. त्याहूनही स्वत:मध्ये दोष असताना पत्नीला

| June 2, 2013 02:36 am

पत्नीला वंध्यत्वावरून सतत हिणवणे ही पराकोटीची क्रूरताच आहे, असे स्पष्ट करीत वांद्रे कुटुंब न्यायालयाने ५१ वर्षांच्या महिलेला घटस्फोट मंजूर केला. त्याहूनही स्वत:मध्ये दोष असताना पत्नीला वंध्यत्वावरून हिणवणे हे तर त्याहून क्रूर असल्याचे न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर करताना नमूद केले.
संबंधित दाम्पत्याचा १९९५ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर ते चेन्नई येथे राहत होते. घटस्फोटासाठी केलेल्या अर्जात पत्नीने दावा केला होता की, चेन्नई येथे ते दोघे एका स्टोअर रूमएवढय़ा छोटय़ा घरात रहात होते. परंतु लग्न झाल्यापासूनच पतीकडून आपल्याला नेहमीच वाईट वागणूक मिळाली. प्रत्येक गोष्टीसाठी आई-वडिलांकडून पैसे आणण्यासाठी सांगितले जायचे. आजारपणाचा खर्चही पतीकडून दिला जात नसे. अशा परिस्थितीत गेली दहा वर्षे संसार केल्यानंतर पतीने स्वत:तील दोष लपविण्यासाठी आपल्याला मूल होत नाही म्हणून हिणविण्यास सुरुवात केली. त्याच्याकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळूनच घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे पत्नीने अर्जात म्हटले होते.  
दुसरीकडे पतीने मात्र पत्नीकडून त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर लावलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले. तसेच तिचा आळशी आणि अडेल स्वभावाचा त्रास १४ वर्षांपासून आपण आणि आपले कुटुंब सहन करीत असल्याचा दावा त्याने केला. एवढेच नव्हे, तर आपल्यावर वंध्यत्वाचा आरोप करून बदनाम करण्याचा ती प्रयत्न करीत आहे, असाही दावा केला.
दोघांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि दोघेही मूल होण्यास सक्षम असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी न्यायालयाला दिला. पती-पत्नीने स्वत:चा दावा सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या आणि पुढे आलेल्या अन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने निर्वाळा दिला की, पत्नीला अपमानित करण्यासाठी तिला अशाप्रकारे दोष देणे ही क्रूरताच आहे.त्यामुळेच क्रूरतेच्या मुद्दय़ावरून तिला काडीमोड घेण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करीत न्यायालयाने पत्नीचा घटस्फोटाचा अर्जही मंजूर केला.

दोघांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि दोघेही मूल होण्यास सक्षम असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी न्यायालयाला दिला. पती-पत्नीने स्वत:चा दावा सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या आणि पुढे आलेल्या अन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने निर्वाळा दिला की, पत्नीला अपमानित करण्यासाठी तिला अशाप्रकारे दोष देणे ही क्रूरताच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 2:36 am

Web Title: bandra court granted divorce to 51 years old woman
टॅग : Woman
Next Stories
1 शुभदा कर्णिक यांचे निधन
2 कंत्राटदारांशी हातमिळवणी करणाऱ्यांवर कारवाई करा
3 बक्षिसाची रक्कम लाटणाऱ्या दक्षता अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
Just Now!
X