बाणगंगा तलाव प्रदूषण प्रकरण

मुंबई : वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या शेजारी होणाऱ्या खासगी व्यावसायिकाच्या बांधकामामुळे या तलावातील नैसर्गिक झऱ्यांवर परिणाम होईल की नाही याची राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेतर्फे  (एनजीआरआय) वैज्ञानिक चाचणी करण्यात येणार होती. मात्र करोनास्थितीमुळे ही चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही. करोनास्थिती सुधारल्यावरच ती करण्यात येईल, असे गुरुवारच्या सुनावणीत स्पष्ट करण्यात आले.

तलावाच्या शेजारी होणाऱ्या खासगी व्यावसायिकाच्या बांधकामामुळे तलावातील नैसर्गिक झऱ्यांवर मोठय़ा प्रमाणात परिणाम होईल, असे तज्ज्ञांच्या प्राथमिक अहवालातून दिसत नाही. असे असले तरी ‘एनजीआरआय’ याबाबत वैज्ञानिक चाचणी करावी आणि २१ एप्रिलपर्यंत आपला अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. बांधकाम सुरू असताना ही पाहणी करायची आहे. त्यामुळे पाहणीसाठी जाण्यापूर्वी ४८ तास आधी संस्थेने बांधकाम व्यावसायिकाला काम सुरू करण्याबाबत कल्पना द्यावी, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले होते. तज्ज्ञांचा अहवाल येईपर्यंत तलावाजवळील खासगी इमारतीच्या बांधकामाला न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कु लकर्णी यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी करोनाच्या स्थितीमुळे आमचे पथक पाहणीसाठी मुंबईत दाखल होऊ शकत नाही. ही स्थिती सुधारल्यावरच पथक मुंबईत येऊ शके ल. शिवाय पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी १५ ते २० दिवस लागतील, असे ‘एनजीआरआय’तर्फे  न्यायालयाला सांगण्यात आले. तर तज्ज्ञांच्या आधीच्या अहवालाचा दाखला देत काम सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकातर्फे  करण्यात आली.

राज्य सरकारनेही करोनामुळे कठोर निर्बंध लागू के ले असले तरी इमारतींचे बांधकाम सुरू राहील असे स्पष्ट के ले आहे. त्यामुळे बांधकाम अनिश्चित काळासाठी बंद ठेवू नका. असे व्यावसायिकातर्फे  सांगण्यात आले. न्यायालयाने मात्र करोना स्थिती सुधल्यावर पाहणी के ली जाईल, असे नमूद करत न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी जून महिन्यात ठेवली.