मुंबई महापालिकेतील इंजिनिअरच्या हत्येचे कारस्थान रचल्या प्रकरणी पोलिसांनी एका ३२ वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही महिला एका मोठया राष्ट्रीयकृत बँकेत सहाय्यक मॅनेजर पदावर आहे. आरोपी महिला आणि इंजिनिअरमध्ये विवाहबाह्य संबंध होते. महापालिकेत इंजिनिअर असलेल्या तरुणाने नाते संपवले, तेव्हा महिलेने ओदिशामधील एका व्यक्तीला इंजिनिअरच्या हत्येची सुपारी दिली असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्या इंजिनिअरचे प्राण वाचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेत मॅनेजर असलेली महिला आणि इंजिनिअर दोघेही विवाहित आहेत. महिलेला तिच्या नवऱ्याला घटस्फोट देऊन इंजिनिअरसोबत लग्न करायचे होते. इंजिनिअरला त्या महिलेसोबत लग्न करायचे नव्हते, त्यावरुन त्यांच्यामध्ये सतत वाद व्हायचे. दोन महिन्यापूर्वी त्यांच्यामध्ये यावरुन भांडण झाले, त्यावेळी इंजिनिअरने तिला खूप सुनावले, तिला अपमानित केले होते असे पोलिसांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी या कॉन्ट्रॅक्ट किलरला अटक केली असून त्याचे नाव विजय प्रधान (२४) आहे, तो बीसएसी ग्रॅज्युएट असून ओदिशाहून सहा नोव्हेंबला तो मुंबईत दाखल झाला. प्रधान आणि महिलेने इंजिनिअर राहत असलेल्या जागेची दोन दिवस पाहणी केली. हत्या करण्यासाठी शस्त्र देण्यासाठी तिने विजय प्रधानला दादर रेल्वे स्टेशनला बोलावले होते. “दादर स्टेशनबाहेर विजय प्रधान आणि महिलेच्या हालचाली पोलिसांना संशायस्पद वाटल्या. पोलीस दोघांना स्टेशनमध्ये घेऊन गेले” असे या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने सांगितले. पाच गोळया आणि बंदुक त्याच्याकडून जप्त करण्यात आली. पोलीस ठाण्यात चौकशीमध्ये या कटाचा उलगडा झाला.