कारसाठी कर्ज मिळवून देतो असे सांगत आलेल्या एजंटने १ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना अंधेरी येथे उघडकीस आली आहे. कर्जासाठी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन या तथाकथित एजंटने रद्द केलेला धनादेश घेतला होता. मात्र त्यानंतर आपल्या खात्यातून एकाएकी १.४० लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदाराने डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार शाई उडून जाणाऱ्या मॅजिक पेनने केल्याची शंका तक्रारदार व्यक्त करत आहे.

अंधेरीत राहणाऱ्या इम्रान रुपानी यांना जून महिन्याच्या सुरुवातीला आपण बँक ऑफ इंडियातून बोलत आहोत, तुम्हाला सुलभ हप्त्यात कर्ज हवे का, याची विचारणा केली. सुभाष सिंग नाव सांगणाऱ्या या व्यक्तीने तुमच्या गरजेनुसार कर्ज मिळेल असे सांगितले. इम्रान यांना कार घ्यायची असल्याने त्यांनी सिंग यांना भेटण्यास सांगितले. तेव्हा २७ जूनला सुभाष सिंग इम्रान यांना भेटला. त्यांच्याकडून निवासाचा, उत्पन्नाचा दाखला घेऊन त्यांच्याकडून एक रद्द केलेला धनादेशही सिंगने घेतला. लवकरात लवकर तुमचे कर्ज मंजूर होईल असेही त्याने इम्रान यांना सांगितले. मात्र दुसऱ्याच दिवशी इम्रान यांना त्यांच्या खात्यातून १ लाख ४० हजार रुपये काढल्याचे लक्षात आले. त्यांनी बँकेत चौकशी केली असता, धनादेशाच्या साहाय्याने हे पैसे काढण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर इम्रान यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.