सोशल मिडियातून ‘ब्ल्यू प्रिंट’संबंधी वृत्त प्रसारित होत आह़े  मात्र मी त्याविषयी अद्याप काहीच जाहीर केलेले नाही़  त्यामुळे हे वृत्त खोटे असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात स्पष्ट केले. या ‘ब्ल्यू प्रिंट’च्या विमोचन कार्यक्रमासाठी उद्योगपती रतन टाटा आणि अंबानी येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या कार्यक्रमाविषयी त्यांना आणि मला काहीच माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘मिक्ता-२०१४’ नाटय़- चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी ठाण्यात आले होते. उपस्थितांशी संवाद साधत राज यांनी ब्ल्यू प्रिंट विषयी येणाऱ्या वृत्तासंबंधी स्पष्टीकरण दिले. चॅनेलवाल्यांचा उल्लेख पुरवठा मंत्री असा करत ‘हेच सर्व काही ठरवत असल्याचा’ आरोप त्यांनी या वेळी केला. काही चॅनेलवाले व्हॅटस् अ‍ॅपवरील संदेशाच्या आधारे ब्ल्यू प्रिंट विषयी बातम्या प्रसारित करत असून त्यांचे पाहून काही वृत्तपत्र दुसऱ्या दिवशी तीच बातमी प्रसिद्ध करीत आहेत़  ब्ल्यू प्रिंटविषयी अद्याप काहीच जाहीर केलेले नसतानाही अशाप्रकारचे निराधार वृत्त प्रसारित होत असून मुल झालं की सांगतो, त्यासाठी सारखा दरवाजा ठोकायची गरज नाही, अशी खास ठाकरेशैलीत माध्यमांची खिल्ली उडवली. सोशल मिडीया जितका चांगला आहे, तितकाच त्रासदायक आहे. त्यामुळे सोशल मिडीयापासून दूर राहावे, ते विरंगुळापुरतेच ठीक आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले.