लोकसहभागातून उद्यानाचा विकास; पक्ष्यांच्याही संख्येत वाढ

फुलपाखरांना स्वच्छंदी बागडता यावे, या उद्देशाने वर्षभरापूर्वी आरे डेअरी परिसरात उभारलेले फुलपाखरू उद्यान आता विविध जातींच्या रंगीबेरंगी सुंदर फुलपाखरांनी बहरले आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला उद्यानात विविध जातींची फुलपाखरे बागडताना पाहायला मिळत आहेत.

निसर्गप्रेमींसाठी अन्य पक्षी-प्राण्यांप्रमाणे फुलपाखरूदेखील आस्थेचा विषय आहे. फुलपाखरांचे जैवविविधतेतील महत्त्व जाणून पर्यावरणप्रेमी असलेल्या संदीप आठल्ये यांनी वर्षभरापूर्वी आरे डेअरी परिसरात वन्य फुलपाखरांसाठी उद्यान उभारले. विविध जातींच्या फुलपाखरांना स्वच्छंदपणे बागडता यावे या उद्देशाने लोकसहभागातून हे उद्यान साकारण्यात आले आहे. आरे डेअरी प्रशासनाने हे उद्यान उभारण्यासाठी दोन एकर जागा उपलब्ध करून दिली. खडकाळ व पडीक असलेल्या या जागेवर १० ते १५ वर्षांपूर्वी गुलाबाची बाग होती. मात्र तेव्हाच्या आरे प्रशासनाच्या अनास्थेमुळे ती गुलाबाची बाग सुकून गेली. तेव्हापासून ही जमीन पडीक आहे. या पडीक जागेची मशागत करून संदीप आठल्ये व त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी येथे १०० विविध प्रकारची झाडे लावली.

वर्षभरापूर्वी उद्यानात लावण्यात आलेल्या या झाडांची वाढ झाल्यावर तिथे रंगीबेरंगी फुलपाखरांनी आपले बस्तान जमवले आहे. या झाडांवरील फुलांच्या रंगांमुळे, मधामुळे आकर्षित होऊन उद्यानात रंगीबेरंगी विविध जातींच्या फुलपाखरांच्या संख्येत वाढ झाली आहे.

या उद्यानात जट्रोफा, जमैकन ब्ल्यू स्पाइक, पेंटास, खुळखुळा मोगरा, रुई, तुळस, जास्वंद आदी झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांमुळे उद्यानात फुलपाखरांप्रमाणे इतर पक्षी, सरडे यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. उद्यानात दहिसर मेट्रोच्या कामादरम्यान तोडण्यात आलेली झाडेदेखील जगवण्यात आली आहेत.

मुंबईत आता क्वचितच दिसणाऱ्या फुलपाखरांच्या संख्येत या उद्यानामुळे वाढ झाली आहे. उद्यानामुळे आजकाल आमच्या परिसरात फुलपाखरे सहज दिसून येतात, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी व्यक्त करीत आहेत. सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरांना स्वच्छंदीपणे बागडता यावे आणि पर्यावरणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करता यावा, ही माफक अपेक्षा आहे. वन्य फुलपाखरांसाठी तयार करण्यात आलेल्या या उद्यानात मानवी अतिक्रमण होऊ  नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत संदीप आठल्ये यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.