वर्कर्स युनियन पोलीस तक्रार करणार

मुंबई : बेस्ट कामगार सेनेने बेस्ट प्रशासनाशी केलेला वेतन करार ज्या कामगारांना मान्य नाही त्यांना यंदा बोनस देऊ नये, असे परिपत्रक बेस्ट प्रशासनाने काढले आहे.

हे परिपत्रक जुलमी असल्याचा आरोप बेस्ट वर्कर्स युनियनने केला असून या विरोधात युनियनने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनला हा करार अमान्य आहे. त्यामुळे कामगार सेनेच्या सदस्यांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांनी या करारावर सह्य़ा केलेल्या नाहीत. त्यामुळे ज्यांना वेतन करार मान्य नाही त्यांना बोनस देऊ नये, असे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे.

बेस्टच्या वेतन करारावरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. बेस्ट कामगार सेनेने प्रशासनाशी केलेला वेतन करार कृती समितीला मान्य नाही. त्यामुळे या करारावरून वाद आहे. बेस्टच्या कामगारांचा वेतनाबाबतचा सामंजस्य करार बेस्ट समितीच्या सभेत मंजूर झाला. हा करार शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेने केला आहे. बेस्टमध्ये बेस्ट कामगार सेनेच्या विरोधात इतर संघटना एकवटल्या आहेत.

राज्य सरकारने २६ जुलै २०१९ पासून बेस्टला ‘बीआयआर अ‍ॅक्ट’मधून वगळले आहे. त्याऐवजी आता ‘इंडस्ट्रिअल अ‍ॅॅक्ट’ लागू झाला आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेशी करार करण्याचे बंधन प्रशासनावर राहिलेले नाही. मात्र अन्य संघटनांनी याला छुपा विरोध केला आहे. ज्यांना करार मान्य नाही त्यांना वेतनवाढ मिळणार नाही, अशी अट आधीच प्रशासनाने घातली आहे. त्यातच आता बेस्ट प्रशासनाने ९००१ रुपये बोनस जाहीर केला आहे. मात्र ज्यांनी करारावर सह्य़ा केल्या नाहीत त्यांना बोनस मिळू नये, असेही परिपत्रक सर्व अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

बोनस हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार असून ज्यांना करार मान्य नाही त्यांनाही तो मिळाला पाहिजे, अशी भूमिका बेस्ट वर्कर्स युनियनने घेतली आहे.