उपनगरीय लोकल रेल्वे सेवेनंतर मुंबईकरांच्या वाहतुकीचे प्रमुख साधन असलेल्या बेस्टची वाहतूक सोमवारी बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेने मागण्या मान्य न केल्यामुळे काल बेस्ट कृती समितीने संपाची हाक दिली होती. त्यानुसार काल मध्यरात्रीपासून या संपाला सुरूवात झाली होती. त्यानंतर आज सकाळपासून मुंबईच्या रस्त्यांवरून बेस्टच्या बसेस दिसेनाश्या झाल्या आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटीसाठी बाहेर निघणाऱ्या बहिणी आणि भाऊरायांना त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या संपात बेस्टचे तब्बल ३६ हजार कर्मचारी सहभागी होतील, असा कयास आहे. त्यामुळे निश्चितच या संपाची व्याप्ती मोठी असेल. तेव्हा या वादावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास मुंबईकरांच्या त्रासात भर पडू शकते. दरम्यान, आज संपाची झळ पोहचल्यानंतर पालिका प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांशी वाटाघाटी करायला तयार होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आर्थिक तोट्यातील बेस्टच्या कर्मचाऱ्यांची वेतनासह इतर सर्व जबाबदारी मुंबई पालिकेने घ्यावी, तसेच अन्य मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने उपोषणासह अन्य मार्ग अवलंबले. पण त्यातून काहीही निष्पन्न न झाल्याने अखेर रविवार मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. याबाबतीत आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही, असा निर्धार बेस्ट कृती समितीच्या शशांक राव यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे संपूर्ण मुंबई, उपनगरे आणि आसपासच्या शहरांत बेस्टची सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. बेस्टच्या सुमारे पावणेचार हजार बसेस असून त्यांच्या मुंबईप्रमाणेच मीरा-भाईंदर, नवी मुंबई आदी भागांत सेवा चालतात. या संपामुळे बेस्टच्या २८ लाख प्रवाशांना त्याचा फटका बसेल. त्यात विद्युत उपक्रमाचा समावेश नसल्याने शहरातील बेस्टच्या वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

बेस्ट कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचीही रविवारी भेट घेण्यात आली. या पाच मिनिटांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन १० तारखेपूर्वी देण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाला दिले होते. या पार्श्वभूमीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी लगोलग दुपारी महापौर बंगल्यावर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संप मागे घेण्याची विनंती केली. मात्र, बेस्ट कृती समितीच्या नेत्यांनी ही विनंती सपशेल फेटाळून लावली. त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आवाहन केले होते. संप करुन बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. आम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करुन मुंबईकरांना वेठीस धरु नये. या सगळ्याचा विचार करुन बेस्ट कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी निर्णय घ्यावा, असे महापौरांनी म्हटले होते.

live updates:

* बेस्ट संपाबाबत दुपारी ३ वाजता ‘मातोश्री’वर बैठक, संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार
* उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त मेहता यांच्यात चर्चा

* बेस्ट संपाबाबत दुपारी तीन वाजेपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता

* बेस्ट संपामुळे आगारातून एकही बस बाहेर पडलेली नाही. आगारामध्ये शुकशुकाट
* बेस्ट कामगारांच्या संपाला मध्यरात्रीपासून सुरुवात; बेस्ट बस वाहतूक ठप्प