तीन दिवसांनंतर पाऊसही थांबला असला, तरी दक्षिण मुंबईतील तब्बल पाच हजार घरे अजूनही अंधारात आहेत. मुसळधार पावसामुळे शुक्रवारपासून विद्युत उपकेंद्र नादुरुस्त होण्याच्या संख्येत वाढ होत असून यंत्रणा सुरू ठेवताना बेस्टच्या नाकीनऊ आले आहेत. सोमवारी रात्री तब्बल १३८ ठिकाणची उपक्रेंद्रे नादुरुस्त होती. युद्धपातळीवर काम सुरू असले तरी सर्व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान दोन दिवस लागणार असल्याचे बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी स्पष्ट  केले आहे.
नाल्यातील गाळामुळे शहरभर तुंबलेले पाणी ओसरले असले तरी विद्युत उपकेंद्रातील बिघाडामुळे बेस्ट उपक्रमाचे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. बेस्ट विद्युत उपक्रमाने वर्षभर देखभाल व दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष व पालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे उपकेंद्रात घुसलेले पाणी या दोहोंचा फटका दक्षिण मुंबईतील वीजग्राहकांना बसला आहे. शुक्रवारपासून विद्युत यंत्रणेत बिघाड सुरू झाला. मात्र ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे खोदकाम करून दुरुस्ती करण्यात अडथळे येत होते. सोमवारी सकाळपर्यंत १६ हजार मीटर बिघाडांपैकी ११ हजार दुरुस्त करण्यात आले, मात्र उर्वरित मीटर दुरुस्त होण्यासाठी आणखी किमान दोन दिवस लागणार आहेत. दरम्यान, ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी बेस्ट तयार नसल्याने रहिवाशांमधील रोष वाढलेला आहे. आमच्याकडे रविवारी रात्री १० वाजता वीज गेली. त्यानंतर हेल्पलाइनच्या तीनही क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तक्रार नोंदवण्यासाठी इतर क्रमांक फिरवण्यासाठीच १५ मिनिटे गेली. त्यानंतर तक्रार नोंदवून घेतली तरी २४ तासांनंतरही आमची तक्रार दूर करण्यासाठी एकही कर्मचारी आलेला नाही. वारंवार संपर्क केल्यावरही ‘बेस्ट’कडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असे प्रभादेवीतील कामगारनगरमधील महेंद्र पवार यांनी सांगितले.

पाण्याचा अडथळा
पाणी तुंबल्याने खोदकाम करून दुरुस्ती करण्यावर अडथळे येत होते. काही ठिकाणी ओव्हरहेड वायर टाकूनही वीजपुरवठा केला. त्याचप्रमाणे विद्युत तारा दुरुस्त करण्यासाठी शिडी असलेली गाडीची गरज पडते. युद्धपातळीवर काम करून पुढील दोन दिवसांत सर्व मीटर दुरुस्त केले जातील, असे बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले.