दरवर्षी पावसाळ्यात वीज खंडित होऊन तसेच वीजेचा झटका लागून अपघात होण्याचे प्रमाण पाहता, अशा घटना टाळण्यासाठी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाने उपाय योजना केल्या आहेत. यात आग लागणे, वीजेचा झटका बसणे, ठिणग्या उडणे, वीज पुरवठा खंडित होणे अशा परिस्थिती ग्राहकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी  हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही तक्रार नोंदवताना वीज ग्राहकांना वीजग्राहक क्रमांक अथवा वीजमापक क्रमांक नोंदवण्याचे आवाहन बेस्टने केले आहे.

सध्या बेस्ट वीज ग्राहकांची संख्या १० लाखांच्या घरात आहे. या ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्टकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी उत्तर विभाग आणि दक्षिण विभागासाठी दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यात दादरसाठी २४१२४२४२, माहिम-२४४४४२४२, वरळी-२४९५४२४२, सुपारीबाग-२४११४२४२, कुलाबा-२२१८४२४२, पाठकवाडी-२२०८४२४२, ताडदेव-२३०९४२४२, मस्जिद-२३४७४२४२ दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यात पावसाळ्यात पाणी साचल्यास जमिनीखालील तारखंड बिघाड शोधण्यास होणारा विलंब आणि कर्मचाऱ्यास कामावर हजर राहण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वीजग्राहकांनी अशा आणीबाणीच्या काळात कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन बेस्टने केले आहे.

वीज ग्राहकांनो हे करा

* वीजमापकांचा (मीटर) पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी वीजमापक केबीन सिमेंटने बांधून घ्या, तसेच केबीन जमिनीपासून उंचावर बांधा.

* परवानाधारक विद्युत ठेकेदारांकडून वीजमापकांच्या केबिनपासून घरापर्यंतचे तारखंड तपासून घ्या.

* अतिवृष्टीच्यावेळी किंवा वीजमापक केबिनमध्ये पाणी गळू लागल्यास किंवा पाणी शिरल्यास आपल्या घरातील विजेचे मुख्य स्वीच बंद करा.

* वीजमापकांची केबिन, मार्गप्रकारश दिव्यांचे खांब, डिस्टिब्युशन खांब यांच्यामधून ठिणग्या उडत असल्यास संबंधित नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधा.

हे करू नका

* वीजमापकांच्या केबिनमध्ये पाणी गळत असल्यास रबरी, बुट, लाकडी अथवा इन्सुलेटेड प्लॅटफार्मचा वापर केल्याशिवाय संच माडणीस स्पर्श करू नका.

* कोणत्याही परिस्थितीत विद्युत ठिणगी पडत असेल तसेच पाणी ठिबकत गळत असेल, मार्ग प्रकाश स्तंभांना, रस्त्यावर असणाऱ्या लाल रंगाच्या डिस्टीब्युशन खांब्याना आणि वीजमापकांना स्पर्श करू नका.

* ज्या सदनिकांना किंवा इमारतींना तात्पुरता पुरवठा देण्यात आला आहे. त्यांनी फक्त अत्यावश्यक उपकरणांचा वापर करावा.