शहरातील बेस्ट वीज ग्राहकांवर परिवहन विभाग तूट अधिभाराचा भार (टीडीएलआर) कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य वीज आयोगाने मंजुरी दिलेल्या वीज दराची वैधता ३१ मार्च २०१६ ला संपत असून नवीन वीज दर येईपर्यंत राज्य वीज आयोगाच्या निर्देशाप्रमाणे वीज दर आकारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बेस्टच्या सुमारे दहा लाख वीज ग्राहकांवर हा अधिभार भार कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी राज्य वीज आयोगाने वीज दरात टीडीएलआर आकारण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार हे वीज दर ३१ मार्चपर्यंत आकारण्यात येणार असल्याचे नक्की करण्यात आले होते. मात्र आता दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही अद्याप नवीन वीज दराबाबतची सुनावणी सुरू झाली नसल्याने नवीन वीज दर लागू होईपर्यंत जुन्याच दराने वीज आकारणी ग्राहकांकडून केली जाणार आहे. यावर टीडीएलआर शुल्क काढून टाकण्याची मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली असून बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार वीज आयोगाला असल्याचे स्पष्ट केले. टीडीएलआर हा वीज दराचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे बेस्ट प्रशासन उत्पन्न वाढीसाठी अन्य पर्यायांचा विचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तर मुंबईच्या अखत्यारीत येणाऱ्या बेस्टच्या वीज ग्राहकांवर परिवहन विभाग तूट अधिभाराचा भार रद्द करण्याची मागणी बेस्ट समितीच्या सदस्यांनी केली आहे. बेस्टची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे ‘टीडीएलआर’ बंद झाल्यानंतर जे काही नुकसान होत असेल त्याची जबाबदारी पालिकेने घेण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी हा अधिभार रद्द करण्याबाबत बेस्ट समिती अध्यक्षांनी प्रशासनाला तीन वेळा निर्देश दिले आहेत. मात्र, प्रशासन अध्यक्षांच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करीत असून मुंबईकरांवर अतिरिक्त भार टाकत असल्याचे आरोपही केला जात आहे.