दिवाळीत दिलेली उचल जानेवारीपासून हप्त्यांमध्ये वसूल करणार

दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून पालिकेच्या मदतीने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलेली ५५०० रुपयांची उचल जानेवारीपासून ११ हप्त्यांमध्ये वसूल करण्याचे संकेत बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आले आहेत. तसेच पत्रच बेस्टने पालिकेला पाठविले आहे. पालिका प्रशासनाने सुचविल्याप्रमाणे बेस्ट उपक्रमाकडून आर्थिक सुधारणाच्या बाबतीत पावले उचलली आहेत. मात्र त्याला अद्याप पालिका सभागृहाची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे भत्ते गोठविणे व बस भाडेवाढीची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. परिणामी, नव्या वर्षांच्या पहिल्याच महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल करण्यात सुरुवात करण्यात येणार आहे. एकूण ११ हप्त्यांमध्ये ही रक्कम वसूल करण्याचा बेस्ट उपक्रमाचा मानस आहे.

पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर झाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनाही तो मिळावा यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि कामगार संघटनांनी आग्रही भूमिका घेतली होती. पालिकेने बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा, अशी भूमिकाही घेण्यात आली होती. मात्र पालिका आयुक्तांनी त्यास स्पष्ट नकार दिला होता. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात पालिका प्रशासन, बेस्ट प्रशासन आणि राजकीय मंडळींमध्ये झालेल्या वाटाघाटीअंती पालिकेने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २१ कोटी ६४ लाख रुपये देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या रकमेतून बेस्ट कर्मचाऱ्यांना ५,५०० रुपये उचल देण्यात आली. मात्र पालिकेने व्यवसायात सुधारणा करण्याच्या अटीवर बेस्टला हे पैसे देण्याची तयारी दर्शविली. बेस्टची आर्थिक सुधारण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू केल्यास आणि ती पालिकेला समाधानकारक वाटल्यास कर्मचाऱ्यांना दिलेली आगाऊ रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून गणण्यात येईल, अशी अट पालिका प्रशासनाने या बैठकीत घातली होती.

आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्रमाने काही वर्षांपूर्वी पालिकेकडून १६०० कोटी रुपये कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या परतफेडीसाठी दर महिन्याला बेस्टकडून पालिकेला ४० कोटी ५८ लाख रुपये देण्यात येतात. ही रक्कम आयसीआयसीआय बँकेतील पालिकेच्या खात्यावर जमा केली जाते. या हप्त्याच्या रकमेतून २१ कोटी ६४ लाख रुपये कर्मचाऱ्यांना उचल देण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांना ५५०० रुपये दिले.

बेस्ट उपक्रमाने पालिका प्रशासनाला अलीकडेच पत्र पाठविले आहे. कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात देण्यात येणाऱ्या वेतनातून ही रक्कम वसूल करण्यात येईल. एकूण ११ हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ५५०० रुपये वसूल केले जातील, असे या पत्रात स्पष्ट म्हटले आहे. कर्मचारी, व्यवस्थापन आणि प्रवाशी या तिन्ही पातळीवर सुधारणा करण्यात यावी, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे काही भत्ते गोठविण्याचा आणि बस भाडेवाढीचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत सादर केला होता. तो बेस्ट समितीने मंजूर केला. परंतु अद्याप पालिका सभागृहाने या प्रस्तावांना मंजुरी दिलेली नाही.

बेस्ट उपक्रमाने समाधानकारकरीत्या सुधारणांची प्रक्रिया सुरू केल्यास दिलेले २१ कोटी ६४ लाख रुपये अनुदानात रूपांतरित होऊ शकतील. अन्यथा ही रक्कम कर्ज म्हणून गणली जाईल.

– संजय मुखर्जी, पालिका अतिरिक्त आयुक्त