बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आज नऊ दिवसांनी मिटला आहे. बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांनी अधिकृतपणे संप मिटल्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी झेंडे, बावटे बाजूला ठेवून कामगार म्हणून एकत्र आलेल्या सर्वांना सलाम करत नऊ दिवस लढा देत आपण यशस्वी झालो असल्याचं सांगितलं. आपली ताकद काय आहे हे सर्वांना दाखवून दिलं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोर्टातून आम्ही आमच्या हक्काचं मिळवलं असल्याचंही ते यावेळी बोलले.

यावेळी बोलताना शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान सात हजार रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती दिली. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा पगार पुढील महिन्यापासून वाढणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोणत्याही साली लागलेला तात्पुरत्या प्रकारातला कर्मचारी असो त्याला किमान 7 हजार रुपये वेतनवाढ मिळणार असं शशांक राव यांनी सांगितलं. तसंच मेडिकल, डीए, प्रवास भत्ता असे सगळ्या प्रकारचे लाभ हे द्यावे लागतील हेदेखील राव यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, वाढीव पगार पुढच्या महिन्याच्या पगारातून येणार. पुढील करारात 2016 पासूनच्या थकबाकीची रक्कम असेल.

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत बेस्ट समिती सेनेची असूनही अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आले असं सांगितलं. उद्धव ठाकरे म्हणाले पैसे नाहीत, कुठून आणू, बेस्टला किती मदत करायची? पण आता बेस्ट ठरवेल किती मदत करायची असा टोला त्यांनी लगावला. किमान वेतनाचा प्रश्न मिटवायचा असता तर कधीच मिटला असता पण मिटवला गलेला नाही असंही ते म्हणाले.

अवाजवी मागण्या आमच्याकडून मान्य करुन घेत होते, मात्र आम्ही मृत्यू पत्करु पण त्या मान्य करणार नाही हे ठणकावून सांगितलं असं शशांक राव यांनी यावेळी सांगितलं. आपल्या हक्काचं सर्व काही मिळवून घेतलं आहे, विलिनीकरण सुद्धा करावं लागेल. आपल्या मागण्यांबाबत सर्व काही हायकोर्टात नोंद आहे, त्याचा कोणी विरोध करु शकणार नाही असंही ते यावेळी बोलले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे
बेस्ट कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होत असताना पैसे कुठून आणायचे? असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. वडाळा डेपोत बेस्टच्या वर्कर्स युनियनच्या कामागारांना संबोधित करताना शशांक राव यांनी हा खुलासा केला. महापौर बंगल्यावर ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी बेस्टकडे पैसे नाहीत, ते कुठून आणायचे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारले होते याचा दाखला देत राव यांनी माननीय हायकोर्टामध्ये याचा फैसला झाला असून हा प्रश्नच राहिला नसल्याचे सांगितले.