वडाळा आगारात कामगारांचा जल्लोष

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा मागण्यांवर तोडगा निघाला असून संप मागे घेण्याची घोषणा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने वडाळा आगारात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात केली आणि एकच जल्लोष कर्मचाऱ्यांनी केला. मेळाव्यात आपल्या भाषणात बोलताना कृती समितीचे नेते शशांक राव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बेस्टकडे पैसे नाहीत आणि पैसे कुठून आणायचे हे उद्धव ठाकरे सांगत होते आणि आता झालेल्या निर्णयानंतर बेस्ट उपक्रम ठरवील की किती मदत करायची ते. बेस्ट प्रशासन व समिती संप कधीच मिटवू शकली असती. पण तो मिटवला नाही, असेही स्पष्ट केले. संप मागे केल्याच्या घोषणेनंतर सायंकाळी चार वाजल्यापासून बेस्टची सेवा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शशांक राव यांनी वडाळा आगारात कर्मचारी वसाहतीत मेळावा घेऊन संप मागे घेतल्याची घोषणा केली. न्यायालयात झालेल्या घडामोडींची व प्रशासनासोबत झालेल्या वाटाघाटीची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या पगारात सात हजार रुपयांची वाढ होईल आणि संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे शशांक राव यांनी मेळाव्यातील भाषणातून स्पष्ट केले. तसेच १ एप्रिल २०१६ पासून बेस्ट कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळतील.

बेस्टमध्ये १,५०० गाडय़ा आणि खासगी कर्मचारी घेण्याचा डाव होता व हे सर्व मृत्युपत्रच होते. महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीत आपल्याला काही मिळत नव्हते. मागील सर्व विसरा हे सांगितले आणि ते अमान्य केल्याचे राव या वेळी म्हणाले. या भाषणानंतर वडाळा आगारात कर्मचाऱ्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर प्रथम वडाळा आगार व घाटकोपर आगारातून बसगाडय़ा सुटल्या.