धावत्या बसच्या इंजिनधून आवाज आल्यानंतर या बसच्या खालील सीएनजीच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना मुंबईत रविवारी दुपारी घडली. ही बस ‘बेस्ट’ उपक्रमाची असून हा प्रकार चकाला चर्च येथे घडला. या अपघातात बसच्या बाजूला उभ्या असलेल्या एका खासगी गाडीनेही पेट घेतला. बसमधील चालक-वाहक आणि सर्व प्रवासी सुखरूप उतरल्यानंतर हा स्फोट झाल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महाराणा प्रताप चौक, मुलुंड पश्चिम ते आगरकर चौक, अंधेरी पूर्व यांदरम्यान धावणारी ३९६ क्रमांकाची बस रविवारी दुपारी १.५० वाजता चकाला चर्चजवळ होती. या वेळी बसचे चालक चंद्रकांत सूर्यवंशी यांना इंजिनातून काही आवाज येत असल्याचे जाणवले.

सूर्यवंशी यांनी बस बाजूला लावल्यावर बसमध्ये असलेले सात-आठ प्रवासी खाली उतरले. तेवढय़ात बेस्टच्या या बसखालून स्फोट झाला. दरम्यान या बसजवळ उभ्या असलेल्या एका गाडीनेही पेट घेतला आणि ही गाडीही जळून खाक झाली. या दोन्ही गाडय़ांना लागलेली आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. बसला अशा प्रकारे आग लागणे धोकादायक असल्याने प्रवासी सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.