इंद्रायणी नार्वेकर

ना पार्किंग क्षेत्रात पालिकेने सुरू केलेल्या कारवाईत दुचाकी गाडय़ांना यापुढे झुकते माप दिले जाणार आहे. पालिकेच्या कारवाईला रहिवाशांकडून मोठय़ा प्रमाणावर विरोध होऊ  लागल्यामुळे पालिकेने आपली भूमिका थोडी सौम्य केली आहे. बस, ट्रक, रिक्षा, टॅक्सी अशा व्यावसायिक गाडय़ांवर प्राधान्याने कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

पालिकेने ७ जुलैपासून सार्वजनिक वाहनतळांच्या ५०० मीटरच्या परिसरात गाडय़ा उभ्या करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये ५ ते १५ हजारापर्यंत दंड वसूल केला जात आहे. या कारवाईचा सर्वाधिक फटका त्या त्या वाहनतळांच्या परिसरातील रहिवाशांना बसला आहे. त्यामुळे लोकांनी या कारवाईला मोठय़ा प्रमाणावर विरोध केला. तसेच दंड वसूल करण्यावरूनही टीका होऊ लागली. त्यातही दुचाकी गाडय़ांसाठी दंडाची एकूण रक्कम ५००० रुपये आहे तर दंड न भरल्यास गाडी सोडवून नेईपर्यंत दर दिवसाचा विलंब आकार ११० रुपये आहे.  दुचाकी वापणारम्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मध्यमवर्गीय रहिवाशांचा समावेश असतो. त्यामुळे या कारवाईमुळे मध्यमवर्गाचे अक्षरश: कंबरडे मोडले. त्यामुळे पालिकेने आता आपले धोरण काहीसे सौम्य केले आहे.

नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी व्यावसायिक गाडय़ांकडून दंड वसूल करण्याच्या सूचना केल्या आहेत. दुचाकी चालकांना समज देऊन सोडून देण्यात येणार आहे.

गाडीत चालक असल्यास कारवाई नको

या नव्या पार्किंग धोरणात आयुक्तांनी अधिक सुस्पष्टता आणली आहे. ना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीत चालक हजर असेल तर कारवाई करू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. गाडी बंद करून चालक गेलेला असेल अशाच गाडय़ावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

३१ लाखाचा दंड वसूल, दुचाकीवर कारवाई नाही

७ ते १६ जुलैपर्यंत ६२३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ३४९ चार चाकी, २२ तीन चाकी, २५२ दुचाकींचा समावेश आहे. या कारवाईतून आजपर्यंत ३१ लाख ५६ हजार ४२५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मंग़ळवारी मात्र एकाही दुचाकीवर कारवाई करण्यात आली नाही.