मुंबई विद्यापीठाच्या जैवभौतिकशास्त्र विभागात संशोधन

मुंबई विद्यापीठाच्या जैवभौतिक (बायोफिजिक्स) विभागाने सापाच्या विषाची तीव्रता कमी करण्याबाबत संशोधन केले आहे. चांदीच्या धातूचे सूक्ष्म (नॅनो) कण सापाच्या विषाची तीव्रता ९५ ते ९८ टक्के कमी करतात, असे या संशोधनातील प्राथमिक निष्कर्ष आहेत. हे संशोधन जपान आणि टॉक्सिकॉन या नियतकालिक जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे.

जैवभौतिक विभागातील संशोधकांनी जैवभौतिक तंत्राचा उपयोग करून चांदीचे सूक्ष्म कण तयार करून त्यांच्या चाचण्या केल्या. विभागप्रमुख प्रा. प्रभाकर डोंगरे हे या प्रकल्पावर काम करीत आहेत. त्यांचे संशोधक विद्यार्थी वृषाली हिंगणे आणि धनश्री पंगम त्यांना सहकार्य करीत आहेत.

सापाचे विष मुख्यत: मेंदू, हृदय, स्नायू आणि रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास विषाला प्रतिरोध करणारे प्रतिजैविक दिले जाते. या प्रतिजैविकाचे अणू घोडय़ाच्या रक्तामधून वेगळे केले जातात. काही वेळेस या  प्रतिजैविकाची त्या रुग्णावर उलट प्रतिक्रिया येते आणि रुग्ण गंभीर होतो. यात त्याचा मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे शाश्वत अशी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी विभागाने हे संशोधन हाती घेतल्याचे विभागप्रमुख प्रा. डोंगरे यांनी सांगितले.

‘सर्पदंशामुळे दरवर्षी ५२ हजार लोकांचा मृत्यू’

जगभरात विशेषत: उष्णकटिबंधातील प्रदेशात सर्पदंशाने मृत्यू होणे ही सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. विशेषत: ग्रामीण भागामध्ये सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात दरवर्षी ५२ हजार लोक सर्पदंशाने दगावतात. सापाचे विष शरीरात वेगाने भिनते. त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सध्या तरी ठोस उपाय नाही. त्यामुळे पाच वर्षांपासून आम्ही संशोधन करीत आहोत. या संशोधनातून जे प्राथमिक निष्कर्ष हाती आले ते विश्वसनीय आणि आशादायक आहेत. त्यामुळे आम्ही आता प्राण्यांवर चाचण्या घेणार असल्याचेही विभागप्रमुख प्रा. डोंगरे यांनी सांगितले.