१८६९ मध्ये कावसजी जहांगीर यांनी क्रॉफर्ड मार्केटची इमारत बाजारासाठी देऊ  केली. त्यानंतर येथे नवनवीन बाजार सुरू झाले. सुरुवातीला या बाजाराला आर्थर क्रॉफर्ड यांच्या नावावरून ओळखले जात होते. स्वातंत्र्यानंतर या बाजाराला महात्मा फुले मंडई हे नाव देण्यात आले. मात्र आजही हा बाजार क्रॉफर्ड मार्केट याच नावाने ओळखला जातो. या इमारतीत प्राणी-पक्ष्यांचा बाजारही त्याचदरम्यान सुरू झाल्याचे म्हटले जाते. नागरिकांना सोयीचे म्हणून मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी हा बाजार सुरू झाला. इमारतीच्या मागच्या बाजूला फळांच्या बाजाराशेजारीच सुमारे ६० ते ७० प्राणी-पक्ष्यांचे विक्रेते व्यवसाय करीत आहेत. येथे विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी अगदी कमी किमतीत विकत घेता येतात.

प्रत्येक प्राण्याच्या विक्रीचा एक सुगीचा काळ असतो. सध्या असाच सुगीचा काळ पर्शियन मांजर आणि लॅबरेडॉर या श्वानाला आलेला आहे. काही वर्षांपूर्वी पॉमेरियन जातीच्या श्वानाला खूप मागणी होती. मात्र सध्या या बाजारात लॅब जातीच्या श्वानांना अधिक पसंती मिळत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. दीड महिन्यापासून ते सहा महिन्यांपर्यंत वयाचे श्वान येथे विक्रीसाठी असतात. सध्या या बाजारात डॉबरमॅन, पॉमेरियन आणि लॅब या तीन जातींचे श्वान उपलब्ध आहेत. इतर श्वान महाग असल्याने ते ग्राहकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातात. येथे एका लॅबची किंमत साधारण ३ ते ८ हजारांपर्यंत असते. याशिवाय पिंजराभर पसरून झोपलेली पर्शियन मांजरही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मांजरीची किंमत ४ हजारांपासून सुरू होते. प्राण्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार किमती येथे ठरविल्या जातात. श्वानांच्या आवाजाबरोबर विविध रंगीत पक्ष्यांचे आवाज ही या बाजाराची ओळख झाली आहे; पण या पक्ष्यांच्या आवाजात किलबिलाटापेक्षा आर्त वेदना अधिक जाणवते. एका छोटय़ा पिंजऱ्यात ५० ते ६० पक्षी भरलेले असतात. मग कुणी ग्राहक येऊन त्यातले डझनभर पक्षी घेऊन जातो, तेव्हा हा गोंधळ काहीसा शांत होतो; पण काही काळच, थोडय़ा वेळातच पक्ष्यांचा दुसरा ‘लॉट’ या पिंजऱ्यात दाखल होतो आणि गोंगाटही टिपेला पोहोचतो. या ठिकाणी विविध प्रकारचे ‘लव्हबर्ड्स’, झेब्रा पक्षी विकले जातात. कासव आणि मासे यांनाही या बाजारात चांगली किंमत असते. पाण्यातील कासव जोडीही ३०० ते ४०० रुपयांना विकली जाते. अगदी कोंबडा आणि कोंबडीच्या जोडीलाही येथे ६०० ते ८०० रुपये भाव मिळतो.

याखेरीज प्राणी, पक्ष्यांच्या पालनासाठी लागणारी सामग्री, त्यांचे खाणे, पिंजरे, माशांचे टँक अशा वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांचीही येथे गर्दी आहे.

लहान मुलांसाठी हा बाजार म्हणजे आनंदाची पर्वणीच. अनेकदा लहान मुलांच्या इच्छेखातर पालक येथे प्राण्यांची खरेदी करण्यासाठी येतात आणि उत्कंठा घेऊन आलेली चिल्लीपिल्ली येथून जाताना आपला साथीदार घेऊन जातात. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर अमाप आनंद दाटून आलेला असतो.

प्राणी आणि पक्ष्यांचा फायदा करून घेत असताना प्राण्यांच्या कायद्यात त्रुटी असल्यामुळे मूल्यशिक्षणात शिकविली जाणारी भूतदया प्रत्यक्षात राबविली जात नाही, हे या बाजारात अधिक ठळकपणे जाणवते. प्राण्यांची पिंजऱ्यातली कोंडी, पक्ष्यांची विष्ठा वेळीच साफ न केल्याने निर्माण होणारी दरुगधी या गोष्टींमुळे या बाजारावर प्राणिप्रेमी टीकाही करतात. प्राण्यांना देण्यात येणाऱ्या वाईट वागणुकीमुळे या बाजाराविरोधात अनेक याचिका न्यायालयात पडून आहेत. हा बाजार बंद करावा, यासाठी अनेक सामाजिक संस्था मोहीम चालवताना दिसतात.

येथे आणण्यात येणाऱ्या प्राणी-पक्ष्यांची तस्करी, अशास्त्रीय पद्धतीने करण्यात येणारे त्यांचे ब्रीडिंग, योग्य प्रशिक्षणाविना त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार या गोष्टींना सामाजिक संस्थांचा आक्षेप आहे. या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांच्या मनोवृत्तीवरही प्राणिप्रेमी नाराजी व्यक्त करतात. एखादी वस्तू निरखून पाहिल्याप्रमाणे प्राणी उचलून त्याची तपासणी करणे आणि आवडला तरीही त्याच्या भावात घासाघीस करणे, या गोष्टी ज्या प्राण्याला आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून नंतर मिरवले जाते, त्या प्राण्याबाबत करणे कितपत योग्य, असा प्राणिप्रेमींचा सवाल आहे; पण अशा अनेक आरोपांनंतर, टीकेनंतर आणि न्यायालयीन याचिकांनंतरही मानवाच्या प्राणिप्रेमाचा हा बाजार अतिशय व्यवस्थित सुरू असतो.

मीनल गांगुर्डे -@MeenalGangurde8