ठाणे महापालिकेतील सत्तेचे गणित ठरविणाऱ्या कोपरी येथील पोटनिवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रेखा पाटील यांनी कॉंग्रेस उमेदवाराचा तर मुंब्रा येथील पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीच्या विश्वनाथ भगत यांनी सपाचे उमेदवार शेख अकबर अली यांचा पराभव करीत विजयी पताका फडकविली. या दोन्ही निकालांमुळे ठाणे महापालिकेत आघाडी आणि युती अशा दोन्ही बाजूंचे संख्याबळ ६५-६५ असे झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक आघाडीच्या गोटात यापूर्वीच सहभागी झाले आहेत. त्यामुळे सत्तेचे सोपान गाठण्यासाठी आघाडी तसेच युतीतील रस्सीखेच अजूनही कायम आहे.
महापालिकेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता शिवसेना-भाजप युतीसाठी कोपरी येथील पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक बनले होते. मुंब्य्रातील पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीचे भगत यांच्यासमोर सपाने आव्हान उभे केले असले तरीही या निवडणूकीत राष्ट्रवादी बाजी मारेल अशीच चिन्हे होती. त्यामुळे कोपरीत पराभव झाल्यास संख्याबळाच्या जोरावर महापौर हातचे गेले असते, अशी भिती युतीच्या गोटात होती.
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात हा प्रभाग येत असल्याने काहीही झाले तरी युतीचा पराभव करायचा, असा चंग आघाडीच्या आणि विशेषत: काँग्रेसच्या नेत्यांनी बांधला होता. उद्योग मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक रविंद्र फाटक यांनी या मतदार संघात सर्व ताकद पणाला लावली होती. भाजपच्या उमेदवारासाठी शिवसेनेचे ठाण्यातील सर्व नेते कोपरीत अक्षरश: ठाण मांडून बसले होते. विशेष म्हणजे, ठाणे, नवी मुंबईतील काही कुख्यात गुंडही या प्रभागात सक्रीय झाल्यामुळे या ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कोपरीतील मतदार नेमका कुणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, सोमवारी जाहीर झालेल्या निकालानुसार, भाजपच्या रेखा पाटील (५४९७) यांनी काँग्रेसच्या अ‍ॅड. अरूणा भूजबळ (२२७६) यांच्यावर मोठय़ा मताधिक्याने विजय मिळविला. या मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्नेहल सुर्वे यांची अनामत रक्कमही जप्त झाली. मुंब्य्रात राष्ट्रवादीचे विश्वनाथ भगत यांनी ३३३२ मते मिळवत समाजवादी पक्षाचे शेख अकबर अली (१००८) यांचा पराभव केला. तर शिवसेना पुरस्कृत उमेदवार अविनाश पवार यांना अवघी ७३ मते मिळाली.

भिवंडीत काँग्रेस विजयी
भिवंडी निजामपूर महापालिकेच्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी तसेच समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा दारूण पराभव करत काँग्रेसच्या उमेदवारांनी दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळविला. काँग्रेसच्या नगरसेविका रेहाना सिद्दीकी तसेच नगरसेवक डॉ. नुरूद्दीन अन्सारी यांचे नगरसेवक पद पक्षांतर कायद्यामुळे रद्द झाले होते. त्यामुळे या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
प्रभाग क्रमांक ५ (अ) मध्ये काँग्रेसच्या उमेदवार अंजुम अहमद सिद्दीकी (२२३७) या ८३६ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बुद्रुन्निसा मुख्तार शेख (१४०१) यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक ६ (ब) मध्ये काँग्रेसच्या दाऊद इब्राहीम अन्सारी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार औरंगजेब (पप्पू) अन्सारी यांचा पराभव केला.  
या पोटनिवडणूकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त झाल्याने या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आसीम आझमी यांना मोठा धक्का मानला जात आहे. भिवंडी महापालिकेत कोर्णाक विकास आघाडीची सत्ता असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष आणि रिपाइंचे नगरसेवक सहभागी आहेत. विरोधी पक्षात काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष असे ४४ नगरसेवक आहेत.पोटनिवडणूकीत दोन्ही जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडणून आल्यामुळे विरोधी बाकांवरील आकडा ४६ असा झाला आहे. तर कोणार्क आघाडीकडे ४४ नगरसेवक आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस अशी युती झाल्यास सत्तेचे गणित बदलू शकते.