News Flash

“क्रॉफर्ड मार्केटमध्ये भेट झालेली ‘ती’ व्यक्ती कोण?,” अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचे गंभीर आरोप

"चौकशी एनआयएकडे द्यावी"

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. शंकेला वाव देणारे अनेक पुरावे समोर आले असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) द्यावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. तसंच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा उल्लेख करत फडणवीसांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.

मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचं नागपूर कनेक्शन आलं समोर

मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. ही कार रोडवर अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या.

फडणवीसांनी काय म्हटलं आहे –
“मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नव्हते,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी धमकीचं पत्र वाचून दाखवत सांगितलं की, “यामधून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही एकच गाडी तिथे आली नव्हती, त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या होत्या. या दोन्ही गाड्या एकाच मार्गाने आल्या असून ठाण्यातूनच आल्या आहेत. गाडी ओळखल्याबरोबर पोलीस अधिकारी सचिन वाझे पहिल्यांदा पोहोचले. कोणीही पोहोचण्याआधी ते पोहोचले नंतर क्राइमचे, स्थानिक पोलीस ठाण्याचे आणि इतर लोक आले. नंतर सचिन वाझे यांनी तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी एका एसीपीला तपास अधिकारी म्हणून नेमलं असून, सचिन वाझेंना का काढलं? हे समजलं नाही”.

पुढे ते म्हणाले की, “योगायोग म्हणजे ज्यांची गाडी चोरीला गेली, त्यांच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाला आहे. सचिन वाझे यांचा तो नंबर असल्याचं समोर आलं आहे. ज्या दिवशी गाडी ठाण्याला बंद पडली, त्यानंतर ओला घेऊन तो कॉफर्ड मार्केटला गेला. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण हा माझा प्रश्न आहे. कोणाला तो भेटला, हे जर काढलं तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील”.

“ज्या ओलामध्ये बसून गेला त्याचं रेकॉर्ड आहे. तो कोणाला भेटला हे ओला कॅब चालकाने पाहिलं आहे. अशा परिस्थितीत वाझे ठाण्यातील, गाडी ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद हे खूपच योगायोग असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गाडी दिसल्याबरोबर वाझे तिथे पोहोचले. धमकीचं पत्रही सचिन वाझे यांना प्राप्त झालं. त्यांनीच ते टेलीग्रामवर टाकलं. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे ही संपूर्ण चौकशी एनआयएला द्यावी, अशी आमची मागणी आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 3:51 pm

Web Title: bjp devendra fadanvis reliance mukesh ambani explosives sachin waze thane crawford market sgy 87
Next Stories
1 मुंबईतील प्रसिद्ध रेस्तराँमधील १० कर्मचारी निघाले करोना पॉझिटिव्ह
2 सुशांत ड्रग्ज प्रकरण : एनसीबी आरोपपत्र दाखल, आरोपींमध्ये रिया चक्रवर्तीचंही नाव
3 मनसेमुळे बंद झाली मुंबईतील ‘कराची बेकरी’? बेकरीचे मॅनेजर म्हणतात….
Just Now!
X