मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने कटकारस्थानं करणं सुरु केलं असल्याचा आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. त्याचबरोबर शिवसेना चार कारस्थानं रचत असल्याचं सांगत याबद्दल त्यांनी मुद्देसूद माहितीही दिली आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना शेलारांनी आपण शिवसेनेला हरवण्यास तयार असल्याचा इशारा फिल्मी शैलीत दिला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या मुद्द्यावरुन शेलारांनी शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं. शिवसेनेने या निवडणुकीसाठी कटकारस्थानं केली आहेत असा आरोप करत शेलारांनी त्याविषयी माहिती दिली. करोनाचा बहाणा करत शिवसेना निवडणूक दोन वर्षे पुढे ढकलण्याचा कुटील डाव रचत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर शिवसेनेचा प्रभाग रचनेचा अभ्यासही कच्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, महापालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने शिवसेना कट रचत आहे. मुदतपूर्व निवडणुका, निवडणुका पुढं ढकलण्यासाठी करोनाचा बहाणा करणं, २०११ च्या जनगणनेवर आधारित नवी प्रभाग रचना करणं, ३० प्रभाग फोडण्याचा प्रयत्न करणं, असे शिवसेनेचे डाव आहेत. मात्र आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही.

आजच्या पत्रकार परिषदेतली आशिष शेलारांची काही प्रमुख वक्तव्य-

बंदुक भी तेरी, गोली भी तेरी, तारीख भी तेरी…सुबह हो या शाम…भाजपा शिवसेनाको हराने के लिए तैय्यार

सामन्यामध्ये हल्ली प्रसिद्ध डायलॉग्स वाचायला मिळतात. त्याच शैलीत आज मला उत्तर द्यायचं आहे असं सांगत त्यांनी फिल्मी पद्धतीने शिवसेनेला चॅलेंज दिलं. निवडणुका जर युद्ध समजायच्या असतील तर आम्ही या युद्धासाठी तयार आहोत. भाजपा कायदेशीर मार्गाने निवडणुका लढवेल असंही शेलार यावेळी म्हणाले.

विषय दाव्याचा नाही, वाद्याचा आहे…

शिवसेनेने मुंबईत नालेसफाईचा दावा केला आहे. पाच लाख मेट्रिक टन गाळ काढल्याचं सांगितलं आहे. त्याबद्दल पुरावे सादर करा. गाळ कुठे टाकला त्याचे फोटो जाहीर करा, वजन काट्याची पावती दाखवा. ही नालेसफाई संपूर्णपणे आभासी आहे.

करुन दाखवलं म्हणणाऱ्यांनी वचन आठवावं….

नालेसफाईच्या नावाखाली शिवसेनेने मुंबईकरांचे ७० कोटी पाण्यात घातले आहेत. शिवसेना मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे वादा आठवा, बचावाचा दावा करु नका. सगळ्या सोयीसुविधा फक्त वरळीतच का…मुंबईतले इतर भाग शिवसेनेला दिसत नाहीत का?

महाभकास आघाडी सरकार कर्तव्यशून्य, भावनाशून्य आणि कर्तृत्वशून्य…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आपले हे गुण दाखवले आहे. त्याचबरोबर आपण कर्तृत्व परावलंबी असल्याचंही मराठा आऱक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारनं दाखवून दिलं आहे.