राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. “विरोधकांसारखे विकृत राजकारण आम्ही करत नाही. मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत”, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला भाजपाकडून त्याच भाषेत उत्तर देण्यात आले.

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आधी उद्धव ठाकरेंवर टीका केली. “महाभकास आघाडीचे भविष्य आणि भवितव्य अंधारात आहे, हे सांगण्यासाठी कुंडली बघण्याची गरज नाही. तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या. (कारण) त्यांचे वाचन सुरू झाले तर पोटात मुरडा येईल”, अशा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला. त्यानंतर आणखी एका भाजपा नेत्याने शिवसेनेला टोला लगावला. शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर हाती शिवबंधन बांधलं जातं. प्रत्येक शिवसैनिक आपल्या हाती शिवबंधन बांधतो. याच संकल्पनेबाबत बोलत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. “कुंडलीचा विषय सोडा… पण ‘गंडे’ बांधून अनेकांना ‘गंडवलं’ त्याचं काय? ते बोला…”, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

आणखी वाचा- “तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या!”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा

याआधी, अवधूत वाघ हे मराठी कलाकारांची खिल्ली उडवणारे ट्विट केल्याप्रकरणी चर्चेत होते. त्यांच्या ट्विटचा अनेक मराठी कलाकारांनी निषेध केला होता. आदेश बांदेकर यांनीही वाघ यांच्या ट्विटचा निषेध केला होता. ‘मराठी अभिनेत्रीने स्वकष्टातून घेतलेली स्कुटी आणि फर्स्ट क्लासचा पास हा आत्मसन्मान आहे. मानधन आणि आर्थिक परिस्थितीवरून केलेली थट्टा ही अत्यंत निंदनीय आहे’, अशी टीका केली होती.