नवी मुंबईतील सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींना अडीचऐवजी तीन एफएसआय देण्यात यावा या आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला त्यांच्याच पक्षातील आठ मंडळ अध्यक्षांनी सुरुंग लावला आहे. याच प्रश्नावरून पक्षाचा एक आमदार निवडून आला असल्याने पालिकेने प्रस्तावित केलेला अडीच एफएसआयचा निर्णय लोकहितार्थ तात्काळ मंजूर करावा, अशा आशयाची पत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहेत. त्यामुळे रहिवाशांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
सिडकोने शहरात बांधलेल्या शेकडो इमारती जर्जर झाल्या आहेत.  त्यामुळे या इमारतींना अडीच एफएसआय द्यावा, अशी मागणी पालिकेने शासनाकडे दोन वर्षांपूर्वी केलेली आहे. बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूर अधिवेशनात नवी मुंबईत अडीचऐवजी तीन एफएसआय देण्यात यावा, अशी विरोधाभास निर्माण करणारी मागणी केली. एफएसआय मागण्यापूर्वी इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट असणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा रिपोर्ट पालिकेने तयार केला असून सिडकोने केवळ तीन एफएसआयची मागणी करून संभ्रम निर्माण केला आहे. अडीच की तीन या वादात हा निर्णय रखडला असून मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा आहे. त्यामुळे नवी मुंबईतील भाजपच्या दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, वाशी (दोन), नेरुळ, सीवूड, सानपाडा येथील मंडळ अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन  पालिकेने प्रस्तावित केलेला अडीच एफएसआयचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, अशी विनंती केली आहे.