महाराष्ट्रात भाजपच्या सदस्य नोंदणीचे एक कोटींचे लक्ष्य गाठण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते हातघाईवर आल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून ‘व्हॉटस अ‍ॅप’सारख्या समाजमाध्यमांतून याच्या अनेक किश्श्यांची देवाणघेवाणही सुरू झाली आहे. सरकारी योजना असल्याचे भासवून सदस्य नोंदणीच्या टोलमुक्त फोन क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देण्यासाठी प्रवृत्त केले जात असून तसे न केल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, असे सांगितले जात असल्याच्या तक्रारीही पुढे येऊ लागल्या आहेत.
व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवरून या तक्रारींचा सूर उमटू लागल्याने भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. सरकारी सर्वेक्षण सुरू असल्याचे भासवून कार्यकर्त्यांचे गट घरोघरी जातात व सदस्य नोंदणीचा टोलफ्री क्रमांक फिरविण्यास सांगतात, अशा प्रसंगाचे एक वर्णन सध्या या माध्यमांतून जोरात फिरू लागले असून त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. अशी घटना कोणाच्या घरी, केव्हा घडली, त्याचा त्यामध्ये उल्लेख नाही. तसेच, हा संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीचेही नाव नाही. प्रदेश भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी असे काही घडत असल्याचा स्पष्ट इन्कारच केला आहे. या साऱ्या कपोलकल्पित आणि बदनामीच्या उद्देशाने रचल्या जाणाऱ्या कहाण्या आहेत, त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असे वाघ यांचे म्हणणे आहे. समाजमाध्यमांतून पसरणाऱ्या या कथित आरोपांचा समाचार घेताना ते म्हणाले की, या आरोपांना कोणताच आगापीछा नसला तरी, कोणताही आर्थिक लाभ नसतानाही भाजपचे कार्यकर्ते घराघरात जात आहेत, याची कबुलीच या कल्पित संदेशातून उघड झाली आहे.
‘आम्ही केंद्र सरकारच्या योजनांबाबत एक सर्वेक्षण करीत असून त्यासाठी टोल फ्री क्रमांक फिरविल्यास पंतप्रधानांच्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत येईल’, असे सांगून दिशाभूल केली जात असल्याचे ‘व्हॉटसअ‍ॅप’वरून फिरणाऱ्या या संदेशात म्हटले आहे. भाजपने याचा इन्कार केला आहे. मात्र, डोंबिवलीतील सदस्य नोंदणी मोहिमेत काही कार्यकर्त्यांनी आपल्यालाही अशीच दिशाभूल करणारी माहिती दिली, असे डोंबिवली येथील रहिवासी कुसुम मधुकर ढोके यांनी सांगितले. टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल दिला नाही तर एलपीजी गॅस सबसिडीचे पैसे मिळणार नाहीत, जनधन योजनेचा लाभ मिळविता येणार नाही, असे आपल्या घरी आलेल्या दोन कार्यकर्त्यांनी सांगितल्याचे त्या म्हणाल्या. या घटनेमुळे भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेच्या हातघाईवर शंकांचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.