कार्यकर्त्यांकडून करोना नियमांचा विसर; दादर स्थानकात प्रचंड गर्दी

मुंबई : करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम त्वरित स्थगित करण्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला तिलांजली देऊन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मोदी एक्स्प्रेस कोकणाकडे रवाना झाली. रेल्वे राज्यमंत्र्यांचा लोकल प्रवास आणि त्यानंतर दादरमध्ये मोदी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवताना झालेल्या प्रचंड गर्दीमुळे अंतर, मुखपट्टी परिधान करणे असे कोणतेही नियम पाळण्यात आले नाहीत. रेल्वे रुळांवर उतरलेल्या आणि इंजिनावर चढलेल्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले.

रेल्वे राज्यमंत्री  रावसाहेब दानवे मंगळवारी सीएसएमटी ते दादर ते ठाणे ते सीएसएमटी असा लोकल प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधणार होते तसेच दादर आणि ठाणे स्थानकात प्रवासी सुविधांचा आढावा घेणार होते. प्रत्यक्षात मात्र ऐन गर्दीच्या वेळी मंत्र्यांच्या भेटीने प्रवाशांच्या अडचणीतच भर घातल्याचे दिसून आले. मंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक विभागातील अधिकारी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासनीस यांचा फौजफाटा, नेते, पक्षाचे कार्यकर्ते यामुळे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती.

डब्यात प्रवासी मोजकेच..

सकाळी १०.१० वाजता सीएसएमटी मंत्र्यांच्या लोकल प्रवासाला सुरुवात होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली; परंतु रेल्वे राज्यमंत्री दानवे अर्धा तास उशिराने सीएसएमटी स्थानकात पोहोचले. साधारण सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी सीएसएमटी ते कुर्ला लोकल पकडली. या लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यात प्रवेश करतानाच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. यात करोना नियमांचा सर्वानाच विसर पडला. डब्यात प्रवेश करणारे काही प्रवासी गर्दी बघूनच उतरून दुसऱ्या डब्यात गेले. प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी मंत्री चढलेल्या डब्यात रेल्वे सुरक्षारक्षक, रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांचीच गर्दी होती. अपवादापुरते के वळ दोन ते तीन प्रवासीच होते. अखेर दादर स्थानकात दानवे उतरले.

साध्या वेशातील पोलिसांशी संवाद..

सीएसएमटी ते कुर्ला लोकलने प्रवास करताना अवघ्या दोन ते तीन प्रवाशांशी संवाद साधल्यानंतर दानवे यांनी लोकलच्या डब्यात एक फे री मारली. त्या वेळीही डब्यात प्रचंड धक्काबुकी आणि गोंधळच होता. गर्दीत समोरासमोरील दोन आसनांवर प्रवासी बसल्याचे पाहून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली; परंतु साध्या वेशातील पोलीस असल्याचे समजताच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आसनावरून उठले आणि पुन्हा डब्यात फे री मारण्यास सुरुवात के ली; परंतु त्यांना प्रवासी मिळालेच नाहीत.