एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेवरुन रेल्वे मंत्रालयाच्या कारभारावर संताप व्यक्त होत असतानाच भाजप खासदार किरीट सोमय्या यांचा गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दुर्घटनेच्या रात्री सोमय्या गरबा खेळण्यात मग्न होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड केला आहे. या व्हिडिओवरुन सोमय्या यांच्यावर टीका होत असली तरी हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.

एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पुलावर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी झाल्याने २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमुळे संतापात भर पडली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत सोमय्या गरबा खेळतााना दिसत आहे. आव्हाड यांनी सोमय्यांचा गरबा खेळतानाचा फोटोही शेअर केला आहे. एल्फिन्स्टनमधील दुर्घटनेच्या रात्री सोमय्या गरबा खेळण्यात मग्न होते असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. भीषण दुर्घटनेत प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतरही खासदार गरबा कसे खेळू शकतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आव्हाड यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत आणि फोटोमध्ये सोमय्या वेगवेगळ्या पोषाखात दिसत आहेत. त्यामुळे आव्हाड यांचा दावा कितपत खरा आहे याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे. या व्हिडिओबाबत सोमय्या यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

एल्फिन्स्टनमधील दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेटमध्ये मोर्चा काढण्याची घोषणा केली असतानाच जितेंद्र आव्हाडही आक्रमक झाले आहेत. ३ ऑक्टोबररोजी कळवा स्टेशनमध्ये रेल रोको आंदोलन करणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे मंगळवारी मध्य रेल्वेवरील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.