मनमानी कारभार करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पालिका सभागृहाची बैठक आयोजित करावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

याबाबत अन्य पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करून सोमवारी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

करोनाकाळात प्रशासनाने अनेक वस्तूंची चढय़ा भावात खरेदी केली आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार करण्यात आली आहे. पण त्याकडे कुणी लक्षच देत नाही असा भाजपचा आरोप आहे.

सभागृहाची बैठक

पालिकेच्या मोठय़ा नाटय़गृहातघ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु ही मागणी धुडकावून दृक्श्राव्य पद्धतीने सभागृहाची बैठक घेतली. एकीकडे प्रशासन, तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना मनमानी कारभार करीत आहे. त्यात मुंबईकरांचे  हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगतले.