‘मोदी’ फॅक्टरमुळे मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चारी मुंडय़ा चीत करून सर्व सहा जागांवर शिवसेना-भाजपचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाल्यामुळे आता भाजप नगरसेवक आणि अन्य कार्यकर्त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी म्हणून आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे. नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची निवडणूक लढविण्याची इच्छा भाजपसाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी साद घातली आणि अवघ्या देशात परिवर्तनाची लाट उसळली. मुंबईत भाजपचे तिन्ही आणि मनसेने शिवसेना उमेदवारांच्या समोर आपले उमेदवार देऊनही शिवसेनेचेही तिन्ही उमेदवार विजयाचे धनी ठरले. मनसेमुळे फटका बसेल असे वाटत असताना शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मताधिक्क्य़ाने विजयी झाल्यामुळे भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयाचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीतही पडण्याची शक्यता आहे. या वाहत्या गंगेत आपलेही ‘चांग भले’ करून घ्यावे असे भाजपचे आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाचे पदाधिकारी आणि पुढे नगरसेवक बनून महापालिकेत पोहोचलेल्या अनेकांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांशी जवळीक साधायला सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपची उमेदवारी मिळवायची आणि ‘नमो’मुळे अनुकूल झालेल्या वातावरणाचा फायदा घेऊन विधानसभेत विराजमान व्हायचे असे मांडे ही मंडळी मनात खाऊ लागली आहेत. विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व्यक्त करू लागल्यामुळे भविष्यात पक्षात बंडाळी माजण्याची भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. तसे झाल्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना नव्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.