८३ हजार मतदान केंद्रांवर भाजपचे ‘एक बूथ २५ युथ’; दानवेंची घोषणा

भाजपच्या स्थापनेला ३८ वर्षे होत असल्याचे निमित्त साधत महाराष्ट्र प्रदेश भाजपतर्फे ६ एप्रिल या पक्षस्थापना दिनी मुंबईत अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ‘महाभाजपा महामेळावा’ घेण्यात येणार असून राज्यभरातून जवळपास तीन लाखांची विक्रमी गर्दी गोळा करून शक्तीप्रदर्शन करत आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. शिवसेनेने स्वबळाची घोषणा केल्याने गरज पडल्यास भाजपही त्यासाठी सज्ज असल्याचा संदेशच एकप्रकारे या मेळाव्यातून दिला जाणार आहे.

या मेळाव्याला राज्याच्या सर्व भागातून, खेडय़ापाडय़ांतून, गावागावांतून आणि प्रत्येक शहरांतून पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मुंबईत येणार आहेत  अशी महिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारने सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी योजना राबवली, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू आहे. राज्यात १३ महापौर, दोन हजार नगरसेवक, ५६२ जिल्हा परिषद सदस्य, १३०० पंचायत समिती सदस्य, ९८ नगराध्यक्ष, पाच हजार सरपंच भाजपाचे आहेत, अशी आकडेवारी देत दानवे यांनी दिली. त्याचबरोबर राज्यात ९२ हजार मतदान केंद्रे (बूथ) असून ‘एक बूथ २५ युथ’ असा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यापैकी ८३ हजार बूथवर २५ युवक नेमण्याचे काम पूर्ण झाले आहे. पक्षाकडून सातत्याने याचा आढावा घेतला जातो. पैकी ८० हजार मतदान केंद्रांवरील २५ युवकांची यंत्रणा मार्गी लागल्याची छाननीही पूर्ण झाली आहे, असे दानवे यांनी सांगितले. त्यातून राज्यातील निवडणुकांची जय्यत तयारी सुरू असून प्रत्येक मतदारसंघात स्वबळावर लढण्याची यंत्रणा भाजपने सज्ज ठेवल्याचा संदेशच दानवे यांनी दिला आहे.

मुंबईतील सहा एप्रिलच्या महामेळाव्यापूर्वी राज्यभर भाजप कार्यकर्ते ३१ मार्च ते चार एप्रिल या कालावधीत ‘बूथ चलो अभियान’ राबविणार आहेत. या काळात प्रत्येक बूथ प्रमुख व पन्नाप्रमुखाच्या घरावर भाजपाचे झेंडे लावण्यात येतील. बूथमधील कार्यकर्ते व नागरिकांच्या बैठका आयोजित करण्यात येतील. तसेच खासदार, आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिकांना भाजपा सरकारच्या विकासकामांची माहिती देतील. याचप्रमाणे बूथमधील एका ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने पक्षातर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात येईल.

शिवसेनेला बरोबर घेऊ

शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केल्याबाबत विचारले असता, पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मित्रपक्षांना एकत्र घेऊन कारभार करण्याचा भाजपला अनुभव आहे. निवडणुका जवळ आल्यावर शिवसेनेशी युतीची बोलणी करू व त्यांना बरोबर घेऊ, सर्वच मित्र पक्षांना जवळ ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे उत्तर दानवे यांनी दिले. तर महामेळाव्यातून प्रसंगी स्वबळासाठी सज्ज असल्याचा संकेत भाजप देत आहे का असे विचारता, पक्षसंघटनेत नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्यासाठी उत्साह देण्यासाठी हा मेळावा असल्याचे दानवे यांनी सांगितले.