शिवसेनेच्या मतपेढीत भाजपची घुसखोरी? स्वतंत्र ओबीसी मंत्री व मंत्रालय स्थापण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

इतर मागासवर्गीय समाजासाठी (ओ.बी.सी.) स्वतंत्र मंत्रालय आणि मंत्री नेमण्याची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या या समाजाला भाजपच्या जवळ आणण्याबरोबरच, हा समाज नेहमीच साथ देणाऱ्या मित्रपक्ष शिवसेनेच्या मतपेढीतही हात घातला आहे.

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तसेच विविध मागण्यांसाठी निघालेले मोर्चे यामुळे इतर मागासवर्गीय, दलित समाजात वेगळी भावना पसरली आहे. आतापर्यंत मराठा समाजाबरोबर अन्य वर्गही एकत्र येत. त्यातून बहुजन विरुद्ध अभिजन अशी विभागणी होत असे. पण मराठा समाजाच्या मोर्चापासून अन्य समाज मराठा समाजापासून दूर गेला आहे. मराठा समाजाच्या मोर्चाना राष्ट्रवादी तसेच काँग्रेस नेत्यांची फूस असल्याचे बोलले जाऊ लागले.  मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्र्यांनी, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही हे स्पष्ट केले. तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी सौम्य केल्या जाणार नाहीत, असेही स्पष्ट केले. अशी भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी मराठा, इतर मागासवर्गीय आणि दलित समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

राज्यात इतर मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या निश्चित किती आहे, याबाबत वेगवेगळे दावे केले जातात. इतर मागासवर्गीय समाजाला १९ टक्के आरक्षण मिळते. या समाजाची लक्षणीय लोकसंख्या लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी इतर मागासवर्गीय समाजासाठी स्वंतत्र मंत्रालय व मंत्री नेमण्याची घोषणा केली असणार हे निश्चितच. या राजकीय निर्णयातून इतर मागासवर्गीय समाजाला आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. मराठा समाजाचे मोर्चे आणि आरक्षणावरील प्रतिक्रिया म्हणूनच बहुधा अलीकडेच झालेल्या नगरपालिकांच्या तीन टप्प्यांमधील निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाची मोठय़ा प्रमाणावर मते भाजप उमेदवारांना मिळाल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून केला जातो. या समाजाच्या कल्याणाकरिता भाजपच प्रयत्नशील असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

राज्यातील प्रभावशाली मराठा समाज हा नेहमीच पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसच्या (राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी) बरोबर राहिला. काँग्रेस पर्याय म्हणून शिवसेना पुढे आल्यावर इतर मागासवर्गीय समाजाने शिवसेनेला साथ दिली. शिवसेनने मंडल आयोगाला विरोध केला होता, पण ओबीसी समाज शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला. काँग्रेसमध्ये जातीपाती बघून निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जाते. याउलट शिवसेनेने कधीच जातीपातीच्या आधारे उमेदवाऱ्या दिल्या नाहीत. शिवसेनेवर कुरघोडी करण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी आता ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय आणि मंत्री नेमण्याची घोषणा केल्याचे बोलले जाते.

माधवचा यशस्वी प्रयोग

इतर मागासवर्गीय समाजाला खूश करण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी झाल्यास त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. भाजपचे चेहरा बदलण्याकरिता मागे वसंतराव भागवत यांनी ‘माधव’चा (माळी, धनगर, वंजारी) राबविलेला प्रयोग यशस्वी झाला होता. भाजपला राज्याच्या अन्य समाजांमध्ये स्थान मिळाले होते. आता ओ.बी.सी. समाजाला जवळ करण्याकरिता फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.