विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात उद्या मतदान होत असतानाच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप व मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्याने भाजपमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. भाजप ठाण्यात उट्टे काढू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले.
खडसे यांच्यावर आरोप होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का, असा सवाल खासदार राऊत यांनी केला. तसेच खडसे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. ठाण्याच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ही मागणी झाल्याने ठाण्यातील सेनेचे प्रमुख नेते बुचकळ्यात पडले आहेत. राऊत यांनी भाजपवर निशाणा साधण्यासाठी वेळ चुकविल्याची प्रतिक्रिया सेनेच्या गोटात बोलले जाऊ लागले. शिवसेना-भाजप युतीचे संख्याबळ जास्त असले तरी राष्ट्रवादीचे वसंत डावखरे हे डाव ‘खरे’ करण्यात तरबेज मानले जातात. भाजपचा एक गट तसेच शिवसेनेचे काही सदस्य डावखरे यांच्या संपर्कात आहे. त्यातच शिवसेनेच्या विजयाला हातभार लावण्यात जिल्हय़ातील भाजप नेत्यांचा विरोध आहे. वसंत डावखरे आणि शिवसेनेचे रविंद्र फाटक या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे.

निवडणुकीत आमदारांना ‘नोटा’!
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीकरिता प्रत्यक्ष मतदान झाल्यास आमदारांना मतपत्रिकेवर नोटा वापरण्याचा अधिकार मिळणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीबरोबरच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या मतपत्रिकेवर नोटाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या मुंबईसह सहा स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रथमच नोटाचा पर्याय देण्यात आला होता. विधानसभेतून निवडून द्यायच्या जागांसाठी नोटाचा प्रथमच वापर केला जाणार आहे.