पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुल यांना जोडणाऱ्या बीकेसी कनेक्टर या उन्नत मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पूर्व उपनगरातून वांद्रे आणि वांद्रे-कुर्ला संकुलाकडे येताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत या उन्नत मार्गाचे काम सुरू असून, प्रकल्पाचा खर्च सुमारे १५५ कोटी रुपये आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरून शीवनजीकचे सोमय्या मैदान येथून सुरू होणारा हा उन्नत मार्ग चुनाभट्टी स्थानक, कुर्ला-शीव रेल्वे मार्ग आणि मिठी नदीवरून जात वांद्रे कुर्ला संकुलात उतरतो. या तीनही ठिकाणी गर्डर बसवण्याचे जिकिरीचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. मात्र लांबलेल्या पावसामुळे डांबरीकरण, मार्गिकांची आखणी वगैरे कामे पूर्ण झाली नव्हती. सध्या या उन्नत मार्गाची बहुतांश कामे पूर्ण झाली असून अंतिम टप्प्यातील उर्वरीत कामे लवकरच पूर्ण होतील आणि हा मार्ग वाहतुकीस खुला होईल, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूर्व द्रुतगती मार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुल आणि वांद्रे पूर्वला जाण्यासाठी शीव सर्कलमार्गे धारावी टी जंक्शन पार करावे लागते. येथे कायमच वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यातच धारावी टी जंक्शनकडे जाणाऱ्या मार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या अर्धवट कामामुळे त्या मार्गावर वाहतुकीला फटका बसतो. त्यामुळे धारावी आगारापासून मोठा वळसा घ्यावा लागतो. बीकेसी कनेक्टर खुला झाल्यानंतर हा टप्पा टाळून थेट वांद्रे कुर्ला संकुल गाठता येईल. या मार्गामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरून वांद्रे कुर्ला संकुल गाठताना तीन किमी अंतर वाचणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले.

शीव उड्डाणपुलाचे काम सुरू?

शीव येथील उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे ११ महिने रखडलेले काम पुढील आठ दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे.  संरचनात्मक परीक्षणानंतर पुलाच्या सांध्यांमध्ये पोकळी निर्माण झाल्याचे मागील वर्षी निष्पन्न झाले होते. डिसेंबर २०१८ मध्येच या पुलाचे बेअरिंग बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने घेतला होता. मात्र हे काम सुरूच झाले नाही. पावसाळ्यात हे काम वेगाने व्हावे यासाठी जॅकची संख्या वाढवायचा निर्णय मे महिन्यात घेण्यात आला. मूळ निविदेनुसार १२ जॅकऐवजी १०० जॅक वापरून चार महिन्यांचे काम चार आठवडय़ांत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला गेला. पण मध्यंतरी जॅक तयार नसल्यामुळे कामाची सुरुवात झाली नाही. अखेरीस पुढील आठ-दहा दिवसांत या कामांची सुरुवात करण्यात येणार असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद  आहे. बेअरिंग बदलण्याचे काम सुरू केल्यानंतर किमान दोन महिने पुलावरील वाहतूक बंद राहील.