माननीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांस,
कानपूरमध्ये एका एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याची बातमी ऐकली. बातमी समजताच मनात धस्स झालं. माझी भावंड कशी असतील आणि मुख्य म्हणजे ज्यांच्यासाठी मी बोच-या थंडीतही निमूटपणे पडून असतो ते प्रवासी कसे असतील याची चिंता वाटत होती. अपघाताच्या बातमीने मी दिवसभर तणावात होतो.
मनात भावना दाटून येत होत्या. खूप काही बोलायचं होतं म्हणून हा लिहिण्याचा प्रपंच. कोणताही अपघात झाला तर पहिल्यांदा संशयाची सुई वळते ती माझ्याकडे. पण खरंच माझी चूक असते का हो… म्हणायला मी एक लोखंडाचा तुकडा.. तुम्हीच तर आणून मला त्या खडीच्या ढिगा-यावर टाकलं. माझ्यावरुन दररोज असंख्य गाड्या धावतात. त्यांचा वेग बघून माझ्या मनातही धडकी भरते. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे वाक्य कुठल्यातरी स्टेशनवर वाचल्याचं आठवतं आणि मी काहीही वाटलं तरी तिथेच पडून असतो. वादळ, मुसळधार पाऊस, गोठवणारी थंडी असो किंवा अगदी करपवून टाकणारं ऊन असो.. मी भीष्माप्रमाणे त्या खडीच्या ढिगा-यावर पडून असतो.
देशात रेल्वेचा पाया रचला ब्रिटिशांनी..
रेल्वे ही गो-यांनी भारतीयांना दिलेली एक देणगी असेही काही जण म्हणतात. स्वातंत्र्यानंतर आपल्या माणसाच्या राज्यात आमच्या प्रकृतीची काळजी घेतली जाईल असं माझ्या आजोबांना वाटलं होतं. काळ पुढे लोटला, गाड्यांची संख्या वाढली पण आमच्या आरोग्याची अवस्था बिकट झाली. मग माझे वडील आणि आता आमचीही तीच गत..
रेल्वेअर्थसंकल्प म्हणजे लोकप्रिय घोषणांसाठी हक्काचे व्यासपीठ. गाड्यांच्या फे-या वाढवा, नवीन गाड्या पळवा पण रेल्वेरुळांच्या नशिबी अवहेलनाच. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींचे सरकार आले. मोदीसाहेब कामाचा धडाका लावतात म्हणे. त्यात मोदींनी तुमच्यासारख्या हुशार आणि उच्चशिक्षित नेत्याला पक्षात आणून थेट सत्तेत मंत्रीपद दिले. तुमच्याकडून खूप आशा होत्या साहेब. तुमच्या पहिल्याच अर्थसंकल्पात तुम्ही लोकप्रिय घोषणांऐवजी पायाभूत सुविधांवर भर देऊ असे सांगितले. तुमचे ते वाक्य ऐकून मन भरुन आलं. आपला कोणतरी माणूस आल्यासाऱखं वाटलं. पण त्यानंतरही अपघातांची मालिका सुरुच आहे. दरवेळी अपघात झाला की माझ्याकडे बोट दाखवून सगळे मोकळे होतात. गेल्या तीन वर्षात झालेल्या अपघातांपैकी ५० टक्के अपघात रेल्वेचे डबे घसरल्याने झाले. यातील २९ टक्के अपघातांचे खापर माझ्यावर फोडण्यात आले. यासाठी खरंच मी जबाबदार होतो की तुमचे खाते.
देशभरात माझ्या कुटुंबाचे जाळे खूप मोठे आहे. सुमारे सव्वा लाख किलोमीटरपर्यंत आम्ही पसरलोय. थंडीच्या काळात आम्ही आकुंचन पावतो आणि मग तडे जातात. यासाठीच आमची देखभाल करण्याची गरज आहे हे सामान्य ज्ञान तुमच्या ‘स्मार्ट’ सरकारकडे नाही का असा प्रश्न पडतो.. अमेरिका आणि चीनमध्ये भारतापेक्षा मोठे रेल्वेचे जाळे मोठे आहे. तिथे तर कडाक्याची थंडी पडत असेल. मग त्यांनी असे अपघात रोखण्यासाठी काय केले याचीही माहिती घ्या. देशाला स्मार्ट बनवताना आणि कॅशलेसचे स्वप्न साकारताना आमच्यावर खर्च करताना कंजूषपणा करु नका हीच कळकळीची विनंती.
आता बुलेट ट्रेनचे स्वप्न रंगवताय. त्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्चही होणार आहे. बुलेट ट्रेन धावू द्या पण माझ्या देखभालीसाठी थोडं मोकळ्या हाताने खर्च करा. माझ्यावर झोपून जीव देणारेही काही जण असतात. त्यांना मी रोखू शकत नाही. पण साहेब माझ्याकडे होणा-या दुर्लक्षामुळे जेव्हा एखाद्या निष्पाप प्रवाशाचा अपघातात मृत्यू होतो त्यावेळी मलाही रडू येतं. (ते दिसत नसलं तरी शेवटी मलाही भावना आहेतच की) ‘भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही’ असे मी ऐकले आहे. तुमच्या आडनावातच प्रभू आहे. हे प्रभू, तुम्ही मला न्याय द्याल आणि माझ्या जीवलग प्रवाशांचे अनमोल आयुष्य वाचवाल हीच आशा.
खडीच्या ढिगा-यावर हताशपणे पडलेला एक रेल्वेरुळ
(विश्वास पुरोहित)