महालक्ष्मी, मालाड आणि देवनारमध्ये दहनभट्टय़ांची उभारणी

मुंबई : माणूस मेल्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी जसे मृत्यूचे प्रमाणपत्र दाखवावे लागते तसेच घरातील पाळीव प्राणी मृत झाल्यानंतर त्यांचेही मृत्यूचे प्रमाणपत्र अत्यावश्यक केले जाणार आहे. पाळीव प्राण्यांचा आणि रस्त्यांवरील भटक्या प्राण्यांचा मृत्यू झाला की त्यांच्या मृतदेहाची कशी वाट लावायची याचा मोठा प्रश्न असतो. प्राण्यांच्या मृतदेहाचे दहन करण्यासाठी पालिकेने आता तीन ठिकाणी दहनभट्टय़ा सुरू करण्याचे ठरवले आहे. शहर भागात महालक्ष्मी, पश्चिम उपनगरात मालाड तर पूर्व उपनगरात देवनार येथे या दहनभट्टय़ा सुरू करण्यात येणार आहेत. याकरिता पालिका साडेसतरा कोटी खर्च करणार आहे. त्यामुळे कचराभूमीवर जाणारे प्राण्यांच्या मृतदेहांचे यापुढे योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र पाळीव प्राण्यांचे दहन करण्यापूर्वी मृत्यूचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.

शहरातील पाळीव प्राण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या प्राण्यांशी संबंधित समस्याही मोठय़ा प्रमाणावर भेडसावू लागल्या आहेत. पाळीव प्राणी मेले की त्यांना पुरण्यासाठी आतापर्यंत कुठेही अधिकृत जागा नव्हती. त्यामुळे जवळपास मिळेल त्या जागी जमिनीत पुरले जाते. तर भटके प्राणी मेले की त्यांचे मृतदेह हे कचराभूमीवर नेऊन टाकले जातात. प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा १९६० व प्राणी जनन नियंत्रण नियमावली २००१ नुसार प्राण्यांसाठी दहनभट्टीची व्यवस्था पालिकेने करणे अपेक्षित आहे. त्यानुसार आता पालिकेने प्राण्यांसाठी तीन ठिकाणी स्मशानभूमी तयार करण्याचे ठरवले आहे. पालिकेने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी तीन अशासकीय संस्थांना जागा दिल्या आहेत. या जागांवर प्राण्यांच्या दहनासाठी पीएनजीवर आधारित दहनभट्टय़ा उभारण्यात येणार आहेत. महालक्ष्मी येथील दहनभट्टी टाटा ट्रस्टमार्फत उभारण्यात येणार असून ती भट्टी पालिकेमार्फत चालवण्यात येणार आहे. तर अन्य दोन ठिकाणी पालिका भट्टी उभारणार आहे. या दहनभट्टय़ा उभारण्यासाठी १३ कोटी ८० लाख रुपये खर्च येणार असून भट्टय़ा चालवण्यासाठी पावणेदोन कोटी व देखभालीसाठी पावणेदोन कोटी खर्च येणार आहे.

प्राण्यांचे मृतदेह पुरल्यामुळे अनेकदा ते भटक्या कुत्र्यांमार्फत उकरले जातात. त्यामुळे वायुप्रदूषण होण्याचा, रोगराई पसरण्याचा धोका असतो. म्हणूनच प्राण्यांचे दहन करण्याची पद्धत योग्य असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या दहनभट्टय़ा उभारण्यात येणार असून देवनार येथील दहनभट्टीची क्षमता ताशी ५०० किलो मांस इतकी आहे तर मालाड येथील दहनभट्टीची क्षमता ताशी ५० किलो मांस इतकी आहे. याबाबतच्या आराखडय़ाला पालिकेच्या वास्तुशास्त्रज्ञ विभागाने इमारत प्रस्ताव विभागाला मंजुरीसाठी पाठवला आहे.

मुंबईतील पाळीव प्राण्यांना मोफत

मुंबईतील परवानाधारक पाळीव कुत्रे, भटके कुत्रे, मांजरे, पक्षी, तसेच श्वान निर्बीजीकरण केंद्रात मृत पावलेले श्वान, मांजर आणि देवनार पशुवधगृहातील मृत जनावरे यांच्याकरिता मोफत उपलब्ध असणार आहे. जनावरांचे दहन करण्यापूवी पालिकेच्या किंवा खासगी नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र तपासून मगच दहन करण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे प्राण्यांवर होणारे जीवघेणे हल्ले, गुन्हे यांनाही आळा बसणार आहे.