अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकारने अधिवेशनात दिलेल्या निलंबनाच्या आदेशाची प्रत पोहचल्यानंतर महानगरपालिकेने कारवाई करत सी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त जीवक घेगडमल यांचे बुधवारी निलंबन केले. निलंबन केल्यावर त्यांची चौकशी केली जाणार आहे. घेगडमल मे महिन्यात निवृत्त होणार  होते.

गिरगाव परिसरातील सी वॉर्डचे अधिकारी जीवक घेगडमल यांनी पायधुनी येथील नऊ मजली अनधिकृत इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल विधानसभा अधिवेशनात मार्च महिन्यात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. मात्र त्यानंतर राज्य सरकारकडून कोणतेही पत्र न आल्याने जीवक घेगडमल सी वॉर्डचा कारभार पाहत होते. तसेच महापालिकेच्या बैठकांनाही हजर होते. अखेर जीवक घेगडमल यांच्या निलंबनाचे पत्र १६ एप्रिल रोजी प्रशासनाला  मिळाले. त्यानंतर बुधवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश  काढण्यात आले.

राज्य सरकारच्या पत्रानुसार घेगडमल यांचे निलंबन  करून नंतर चौकशी करण्याचे आदेश आहेत, असे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. घेगडमल हे मे महिन्यात निवृत्त होणार होते. सध्या सी वॉर्डच्या कामाची अतिरिक्त जबाबदारी बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

महापालिकेच्या कचरा वाहतुकीच्या कंत्राटासंबंधी चौकशी करण्याबाबतही अधिवेशनात चर्चा झाली होती. त्याचप्रमाणे आया, स्मशानभूमी कामगार अशा ड वर्ग कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या परीक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उठले होते. मात्र केवळ घेगडमल यांच्या निलंबनाचे आदेश पोहोचले असून राज्य सरकारकडून इतर कोणत्याही विषयासंबंधी सूचना आलेल्या नाहीत, असे पालिकेच्या  प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.