27 September 2020

News Flash

ट्रायमॅक्सकडून रक्कम वसूल करा!

पाच वर्षांचे कंत्राट ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस या कंपनीला दिले.

(संग्रहित छायाचित्र)

पालिका आयुक्तांचे बेस्टला आदेश; नादुरुस्त तिकीट यंत्रांमुळे दंड

मुंबई : प्रवाशांना तिकीट वितरित करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्युइंग मशीन्स (ईटीआयएम) वारंवार बंद पडून बेस्ट उपक्रमाला सोसाव्या लागलेल्या तोटय़ाची भरपाई म्हणून ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेसकडून प्रतिदिन प्रत्येक नादुरुस्त यंत्रापोटी ५०० रुपये या प्रमाणे २१२ कोटी ३ लाख ८६ हजार रुपये दंड वसूल करण्याची शिफारस पालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी अहवालात केली आहे. लेखा परीक्षकांच्या अहवालाची दखल घेत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेसने ईटीआयएमचे कंत्राट स्वीकारताना बेस्ट उपक्रमाला दिलेली ६ कोटी ९२ लाख ६४ हजार ५०० रुपये बँक हमीची रक्कम दंडाच्या रूपात तात्काळ वसूल करावी, असे आदेश बेस्ट उपक्रमाला दिले आहेत. तसेच उर्वरित दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

बेस्ट उपक्रमाने २०१० मध्ये प्रवाशांना यंत्राच्या साह्य़ाने तिकीट वितरण करण्याचा निर्णय घेतला आणि ही योजना ‘बांधा – वापरा – हस्तांतरित करा’ तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षांचे कंत्राट ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस या कंपनीला दिले. या कंपनीने बेस्टला ७५०० तिकीट वितरण करण्यासाठी यंत्रांचा पुरवठा केला होता. मात्र गरज लक्षात घेऊन बेस्टने १८३० यंत्रे प्रतियंत्र १५ हजार रुपये दराने खरेदी केली. या यंत्रांची दुरुस्ती आणि देखभालीचे काम ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेसवरच सोपविण्यात आले होते. या कंपनीचा कंत्राट कालावधी २०१०-११ मध्ये सुरू झाला.

त्याच वेळी बेस्टने ही यंत्रे कंपनीकडून दुरुस्त करून घेणे क्रमप्राप्त होते. परंतु बेस्टच्या ढिसाळ कारभारामुळे याकडे दुर्लक्ष झाले. ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेसचा कंत्राट कालावधी संपुष्टात आल्यानंतर ईटीआयएमची संपूर्ण यंत्रणा बेस्टने ताब्यात घेणे अपेक्षित होते. परंतु बेस्टने तसे केले नाही. उलटपक्षी बेस्टने याच कंपनीला मुदतवाढ देण्याचा घाट घातला आणि बेस्ट समितीने या कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली, असे पालिकेच्या लेखा परीक्षकांनी  अहवालात म्हटले आहे.

वारंवार ईटीआयएम यंत्रे बंद पडल्यामुळे बेस्ट उपक्रमाला नुकसान सोसावे लागले. ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेसने कंत्राट कालावधीत ईटीआयएम यंत्रांची दुरुस्ती न केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. नियोजित काळात नादुरुस्त यंत्रे न बदलल्यामुळे कंत्राट कालावधीत म्हणजे तब्बल ६६२ दिवस प्रतिदिन प्रत्येक नादुरुस्त यंत्रामागे ५०० रुपये याप्रमाणे तब्बल २१२ कोटी ३ लाख ८६ हजार रुपयांचा दंड ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेसकडून वसूल करावा, अशी शिफारस लेखा परीक्षकांनी अहवालात केली आहे. कंपनीने या योजनेपोटी ६ कोटी ९२ लाख ६४ हजार ५०० रुपये बँक हमी दिली आहे. बँक हमीची रक्कम दंडापोटी वळती करून घ्यावी असेही लेखा परीक्षकांनी अहवालात नमूद केले आहे.

* बेस्ट उपक्रमाने २०१० मध्ये प्रवाशांना यंत्राच्या साह्य़ाने तिकीट वितरण करण्याचा निर्णय घेतला 

* ई-तिकिटिंग प्रकल्प राबविणे, ई-तिकिटिंग पद्धतीचे आरेखन, संचमांडणी आणि अंमलबजावणी करण्याचे पाच वर्षांचे कंत्राट ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस या कंपनीला देण्यात आले होते.

*मात्र कंत्राट कालावधीतच ईटीआयएम यंत्रे वारंवार बंद पडण्याच्या घटना घडल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2018 4:16 am

Web Title: bmc commissioner order best to recover money from trimax
Next Stories
1 मुलुंडमध्ये तरुणावर बिबटय़ाचा हल्ला
2 पटपडताळणीतील दोषींवर फौजदारी कारवाई
3 ‘बॉम्बे हाऊस’ नव्या रूपात
Just Now!
X