प्रशासकीय कामात मराठी भाषेचे सुलभीकरण करण्याचा आयुक्तांचा निर्णय मराठीच्या प्रेमाचे गाडे पुढे करत नगरसेवकांनी फेटाळून लावला. बोजड व सामान्यांच्या आवाक्यापलिकडच्या शब्दांऐवजी सोपे शब्द वापरण्याचा आयुक्तांनी दिलेल्या सूचना धुडकावून लावत अमराठी आयुक्त व इतर दोघा अतिरिक्त आयुक्तांना मराठीची शिकवणी लावण्याचा सल्ला भाजपाच्या गटनेत्यांनी पालिकेच्या स्थायी समितीत दिला.  
पालिकेच्या कामकाजातील बोजड, न समजणाऱ्या शब्दांविषयी प्रतिशब्द द्यावेत या अर्थाचे परिपत्रक आयुक्तांकडून सर्व विभागाच्या प्रमुखांना पाठवण्यात आले आहे. अनुज्ञापन, परीरक्षण, आस्थापना अशा मराठी शब्दांचा अर्थ अनेकांना समजत नाही. त्याऐवजी त्यांचे सोपे प्रतिशब्द देण्याची सूचना आयुक्तांनी केली. मात्र हा मराठी भाषेवरील आघात असल्याची भावना सर्वच पक्षांच्या मराठी, अमराठी नगरसेवकांनी व्यक्त केली. मराठी भाषेमधील शब्दांची समृद्धी कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा हरकतीचा मुद्दा रमाकांत रहाटे यांनी उपस्थित केला. व्यावहारिक भाषेतील प्रतिशब्द कंसात देता येतील, मात्र मराठी भाषा वापरावी, असा इंग्रजी परिपत्रकातून सल्ला आयुक्तांनी देऊ नये, असे रहाटे म्हणाले. सेना नगरसेवकाच्या या मुद्दय़ाला भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी लागलीच पाठिंबा दिला. महानगरपालिकेतील अधिकृत भाषा मराठी आहे. त्यामुळे सर्व व्यवहार मराठीतच होणे गरजेचे आहे. आयुक्त व दोन अतिरिक्त आयुक्त अमराठी आहेत, त्यांना मराठीची शिकवणी लावण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा अशा कानपिचक्या कोटक यांनी दिल्या. सपाचे गटनेते रईस शेख यांनीही इंग्रजीतून कामकाज चालवण्याच्या प्रशासनाच्या धोरणाचा निषेध केला. सर्व पक्षीय सदस्यांचे मराठीबाबतचे मत ऐकल्यावर स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी मराठीच्या परिपत्रकाबाबत पुनर्विचार करण्याची सूचना अतिरिक्त आयुक्तांना दिली. पालिकेचे संपूर्ण कामकाज मराठीतच  चालवले जाईल, असे ते म्हणाले.