कामावर हजर राहण्याचे आयुक्तांचे आदेश

मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय होण्याची शक्यता, जलजन्य आजाराच्या साथींचा प्रादुर्भावाची भीती, साचणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न, पावसाच्या तडाख्यात रस्त्यावर पडणारे खड्डे आदी विविध समस्या भविष्यात भेडसावू नयेत म्हणून पालिकेच्या विविध विभागांमधील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचा फतवा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काढला आहे. सध्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी रजेवर आपल्या गावी गेले असून परिपत्रकाची वार्ता समजताच सुट्टीची मजा लुटणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तर परदेशवारीला गेलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही परतीचा प्रवास सुरू केल्याचे समजते.

पावसाळा २०-२२ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पावसाळापूर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेतील परिरक्षण, इमारती व कारखाने, आरोग्य, कीटक नियंत्रण अधिकारी, जलकामे, उद्यान, घनकचरा व्यवस्थापन अतिक्रमण निर्मूलन या विभागांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असून या अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी परिपत्रक जारी करुन दिले आहेत. संबंधित विभागांमधील साहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांच्यापासून अभियंता वर्ग तसेच कर्मचारी यांना तात्काळ कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १५ जून २०१७ पर्यंतच्या मंजूर केलेल्या अथवा प्रस्तावित रजा रद्द करण्यात आल्या आहेत. अतितात्काळप्रकरणी पालिका आयुक्तांच्या मान्यतेशिवाय कोणत्याही रजा मंजूर करू नयेत, असेही आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या सेवेत कायम असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल १ लाख ५ हजार इतकी आहे.

त्यापैकी ४५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे परिपत्रक लागू होत आहे. ४५ हजारांपैकी अनेक कर्मचारी सध्या रजेवर असून आयुक्तांनी जारी परिपत्रकाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने मुंबईची वाट धरली आहे.

मान्सूनपूर्व कामासाठी सुट्टी रद्द

मंजूर केलेल्या अथवा प्रस्तावित रजा रद्द करण्यात आल्या आहेत. अतितात्काळप्रकरणी पालिका आयुक्तांच्या मान्यतेशिवाय कोणत्याही रजा मंजूर करू नयेत, असेही आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या सेवेत कायम असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल १ लाख ५ हजार इतकी आहे. त्यापैकी ४५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे परिपत्रक लागू होत आहे. ४५ हजारांपैकी अनेक कर्मचारी सध्या रजेवर असून आयुक्तांनी जारी परिपत्रकाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने मुंबईची वाट धरली आहे.

आरोग्यविषयक कामे पावसाळ्यात करावयाची असतात. त्यामुळे काही संबंधित विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मे महिन्यातील सुट्टी रद्द करण्याची आवश्यकता नव्हती. दरवर्षी जूनमध्ये या विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द केली जाते. पण यावेळी मे महिन्यातच हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. याबाबत आधीच पूर्वकल्पना देण्यात आली असती तर आधीच रजा घेता आली असती. रजा रद्द केल्यामुळे मुलांच्या आनंदावर विरजण पडले आहे, अशी खंत काही अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.