८२ टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण; पाच लाख बालके अजूनही लसीकरणाच्या प्रतीक्षेत

मुंबई : गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविलेल्या ‘गोवर रुबेला लसीकरण’ मोहिमेमध्ये सहभागी होण्यास नकार देणाऱ्या बी वार्ड (डोंगरी, काळबादेवी) भागांतील १६ शाळांना पालिका कारणे दाखवा नोटीस पाठविणार आहे.

मुंबईत २७ नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला लसीकरण सुरू झाले. सहा आठवडय़ांसाठी राबविण्यात येणारी मोहीम संपली तरी शहरातील २० लाख ५७ हजार बालकांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे. जानेवारी महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार जवळपास ७७ शाळा या मोहिमेत सहभागी होण्यास पुढाकार घेत नव्हत्या. पालिकेच्या आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या शाळांसोबत सुरू असलेल्या बैठकीनंतर यातील काही शाळांनी लसीकरण करण्यास सुरुवात केली. गेल्या तीन महिन्यांपासून या मोहिमेबाबत प्रचार सुरू असूनही लसीकरण न करण्याच्या भूमिकेवर काही शाळा ठाम आहेत. पालिकेने या शाळांना नमवण्यासाठी आता कायद्याचा मार्ग अवलंबिला आहे. बी वॉर्डमधील १६ शाळांना पालिकेने लसीकरण का करून घेत नाही, याची कारणे दाखवा नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

या शाळांची टाळाटाळ

शहरातील ३००० हजारांहून अधिक शाळांनी लसीकरण पूर्ण केले आहे. मात्र बी (डोंगरी, काळबादेवी, मोहम्मद अली रोड) यांच्यासह भायखळा, कुर्ला (पश्चिम) आणि चेंबूर गोवंडी या भागांतील काही शाळा अजूनही लसीकरण करून घेण्यास तयार नाहीत. वांद्रे आणि सांताक्रूझमधील काही शाळांमध्ये लसीकरण करण्यास पालकांचा विरोध आहे, अशी माहिती साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर यांनी दिली.

शाळांसोबत वारंवार बैठका घेऊनही त्या लसीकरण करून घेण्यास तयार नाहीत. पालक नकार देत असतील किंवा त्यांच्यामध्ये गैरसमज असतील ते दूर करण्याची जबाबदारी शाळांची आहे. मात्र या शाळा सरळ नकारच देत असल्याने पालिकेच्या बी वॉर्ड विभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडून या शाळांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. यातील एका शाळेला नोटीस पाठविलेली असून अन्य शाळांना पाठविली जाईल. नोटीसला उत्तर देण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

– महेश पालकर, शिक्षणाधिकारी, पालिका

* शहरातील ८२ टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण

* अंदाजित २५ लाख  बालकांपैकी २० लाख ५७ हजार बालकांचे लसीकरण

* ५ लाख बालकांचे लसीकरण बाकी