पालिका प्रशासन, महापौरांना उत्तर दाखल करण्याचे आदेश

मुंबई : पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी आपली नियुक्ती न करण्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक आणि पालिकेतील पक्षनेते प्रभाकर शिंदे यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही शिंदे यांच्या याचिकेवर राज्य सरकार, पालिका प्रशासन आणि महापौरांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

योग्य त्या पक्षाच्या पक्षनेत्याची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यास नकार देऊन महापौर पालिकेला प्रभावहीन करत असल्याचा आरोप शिंदे यांनी याचिकेत केला आहे. सद्य:स्थितीला काँग्रेसचे रवी राजा हे विरोधी पक्षनेते आहेत. परंतु शिंदे यांनी राजा यांना याचिकेत प्रतिवादी केलेले नाही. त्यामुळे त्यांना प्रतिवादी करण्याचे आदेशही न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने शिंदे यांना दिले आहेत.

याचिकेनुसार, पालिकेत भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा, तर काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. असे असतानाही महापौर पेडणेकर यांनी भाजपऐवजी काँग्रेसच्या नेत्याची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती केली आहे. २०१७च्या निवडणुकांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपने सत्ताधारी शिवसेनेसोबत जाण्याऐवजी तटस्थ राहण्याचा तसेच विरोधी पक्षनेतेपद न घेण्याचा निर्णय घेतला होता. राजा यांनी याला आक्षेप घेतल्यानंतर त्यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारीत भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी शिंदे यांची  नियुक्ती करण्याची विनंती महापौर पेडणेकर यांना दिली. पालिकेत शिवसेनेच्या ८४, भाजपच्या ८३, काँग्रेसच्या ३१, तर राष्ट्रवादी पक्षाच्या नऊ जागा आहेत. परंतु ९ मार्चला पेडणेकर यांनी लोढा यांची विनंती फेटाळली. त्यामुळे शिंदे यांनी महापौरांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका केली आहे. तसेच पालिका कायद्यानुसार विरोधी पक्षनेतेपदी योग्य त्या व्यक्तीची निवड करण्यासाठी महापौर बांधील असून त्यांचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.