पर्जन्यवृक्षांना लागलेली कीड आणि शहरातील डेरेदार वृक्षांचे मृत्यू यांचे सत्र गेली चार वर्षे सुरू आहे. यासंबंधी पालिकेनेच नेमलेल्या वृक्षतज्ज्ञांच्या समितीने चार वर्षांपूर्वी दिलेल्या अहवालावरही प्रशासनाकडून गंभीरपणे कार्यवाही झालेली नसल्याचे दिसून येत आहे. माणसाप्रमाणेच वृक्षांनाही सशक्त करण्याची गरज असून त्यांच्या मुळांना मोकळी हवा व पाणी मिळण्याची गरज असल्याचे या समितीतील तज्ज्ञांनी पालिकेला सुचवले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय हरित लवादानेही झाडांभोवती एक मीटरची मोकळी जागा ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र वेगवेगळी कारणे पुढे करत पालिकेने या दोन्ही सूचनांना बाजूला ठेवण्यात धन्यता मानली आहे.
शंभर मीटरहून अधिक घेर असलेल्या डेरेदार पर्जन्यवृक्षांनी मुंबईतील अनेक रस्त्यांवर छत्रछाया पसरली आहे. मात्र साधारण चार वर्षांपूर्वी यातील काही झाडांवर मिलीबग (लोकरीचे किडे) दिसू लागले. रुईया महाविद्यालयाचा रस्ता, सांताक्रूझ पूर्वेला स्थानकाजवळचा रस्ता, वांद्रे-कुर्ला संकुलातील झाडांवर पांढरा बुरशीसदृश भाग दिसू लागला व काही महिन्यांनी वृक्ष सुकू लागले. पावसानंतर यातील काही वृक्षांना पुन्हा पालवी फुटली, मात्र ते क्षणभंगुर ठरले व वृक्ष सुकू लागले. पाहता पाहता संपूर्ण शहरातील पर्जन्यवृक्ष या कीटकांच्या आक्रमणाला बळी पडत चालले. यादरम्यान २०११ मध्ये पालिकेचे तेव्हाचे अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांनी शहरातील वृक्षतज्ज्ञांची समिती नेमली. त्याला अनुसरून वेगवेगळ्या रुंदीचे रस्ते व पदपथांचा अभ्यास करून कोणत्या प्रकारचे वृक्ष कुठे लावावेत या संबंधीची लेखी माहिती देण्यात आली होती. झाडे पडण्याचे थांबवण्यासाठी तातडीचे उपाय म्हणून समितीच्या सदस्यांनी शहरातील सर्व वृक्षांची विभागवार पाहणी करून कोणत्या वृक्षांची कशी छाटणी करायची व वृक्ष वाचवण्यासाठी कोणते उपाय योजावेत याचा विस्तृत आढावा महापालिकेला दिला होता. पालिकेच्या उद्यान विभागाने त्या वर्षांपुरती वृक्षांची छाटणीही त्याप्रमाणे केली होती. मात्र त्याचा परिणाम म्हणून अशा अपघातांची संख्या किती प्रमाणात कमी झाली याची आकडेवारी महापालिकेकडून देण्यात आली नाही, असे या समितीतील सदस्य डॉ. विद्याधर ओगले म्हणाले. याशिवाय पालिकेला दीर्घकालीन उपायही सुचवण्यात आले होते. मात्र तातडीच्या उपायांनाही कागदात गुंडाळून ठेवलेल्या पालिकेने दीर्घकालीन उपायांकडे पाहिले नसण्याचीच शक्यता अधिक आहे.
वनशक्तीच्या डी स्टॅलिन यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्येही याच प्रकारची याचिका केली होती. त्यावर हरित लवादाने शहरातील झाडांभोवती एक बाय एक मीटरची जागा मोकळी ठेवण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानंतर पालिकेने काही पदपथांवर याप्रमाणे एक मीटरचे चर खणले, मात्र त्यानंतर जागा नसल्याचे कारण पुढे करत किंवा रस्त्याची जागा कमी होत असल्याचे कारण देत पालिकेने झाडांच्या मुळावरील सिमेंट हटवणे बंद केले.

समितीने सुचवलेले तात्कालिक उपाय
’ वयामुळे मरणपंथाला लागलेल्या झाडांची नोंद करा.
’ कीटकांमुळे झाडाला किती बाधा झाली आहे, त्याची माहिती गोळा करा.
’ झाडाची वाढ रोखण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक शोधा.
’ झाडांचा तोल ढळणार नाही यापद्धतीने छाटणी करा.
’ झाडाला बाधा झालेल्या फांद्या छाटा.
’ झाड मरणपंथाला लागले असेल तर ते तोडून त्याऐवजी नवीन रोपांची लागवड करा.