डॉक्टरसह १६ कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचा महापालिकेचा निर्णय

शिवडीच्या क्षयरुग्णालयातील शौचालयात करोना रुग्णाचा मृतदेह सापडल्याप्रकरणी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ललित आनंदे यांना अधीक्षक पदावरून हटविण्यात आले आहे. तसेच डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉयसह १६ जणांची चौकशी सुरू करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंदे या प्रकरणामध्ये दोषी आढळलेले नाहीत. त्यामुळे त्यांना केवळ पदावरून हटविण्यात आले आहे. निलंबित केलेले नाही. त्यांच्या जागी अन्य डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येईल, असे  पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. डॉ. आनंदे पुढच्या महिन्यात निवृत्त होणार आहेत.

क्षय रुग्णालयात सूर्यभान यादव (२७) उपचारासाठी दाखल झालेल्या तरुणाचा मृतदेह १८ ऑक्टोबरला रुग्णालयाच्या शौचालयात सापडला. सूर्यभान ४ ऑक्टोबरपासून बेपत्ता असून तब्बल १४ दिवसांनी त्याचा मृतदेह विघटन अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी नियुक्त केलेल्या समितीने अहवाल पालिकेला दिला आहे. या अहवालातील शिफारशींना आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. यानुसार रुग्णालयाच्या अधीक्षकांना अधीक्षक पदावर दूर केले आहे. वॉर्डमध्ये कार्यरत असलेले एक डॉक्टर, १२ परिचारिका आणि अन्य तीन वॉर्डबॉय यांना गंभीर शिक्षा देण्याच्या अनुषंगाने विस्तृत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मृत्युच्या घटनेचे गूढ कायम

सूर्यभान यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत मात्र या चौकशीमध्ये समजू शकलेले नाही. सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध न झाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून घटनाक्रम समजलेला आहे. त्याच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले आहे. यासंबंधी पोलिसांची चौकशी सुरू असून याचा अहवालही लवकरच येईल, असे काकाणी यांनी सांगितले.

सीसीटीव्ही असूनही चित्रीकरण नाही

शिवडी क्षयरोग रुग्णालयातील संबंधित वॉर्डच्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही उपलब्ध असूनही यात चित्रीकरण झालेले नाही. त्यामुळे संबंधित अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.