जागतिक वारसा दिन विशेष

मुंबईचा इतिहास उलगडण्याबरोबरच एका कालखंडातील कलानमुना म्हणून ओळखली जाणारी शिल्पे, पुतळे एकांतवासातून बाहेर काढत पुन्हा एकदा खुल्या जागेत आणण्याचा विचार महापालिकेकडून सुरू आहे. ही शिल्पे, पुतळे एकेकाळी दक्षिण मुंबईत मोक्याच्या ठिकाणी होती. ब्रिटिशकालीन खुणा पुसण्याच्या नादात स्वातंत्र्योत्तर काळात ती एकांतवासात गेली. यात ब्रिटिशकालीन प्रशासक, राजकारणी तसेच समाजसेवकांचा समावेश आहे. यातील अनेक पुतळे भायखळा येथील प्राणिसंग्रहालयाजवळ ठेवण्यात आले. परंतु आता नुकत्याच दुरुस्ती करण्यात आलेल्या कूपरेज येथील बॅण्डस्टॅण्डजवळ त्यांना जागा मिळू शकेल.

भारतावर राज्य करण्यासाठी आलेल्या ब्रिटिशांनी त्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, राजकीय तसेच राजघराण्यातील व्यक्तींचे पुतळे शहरात लावले होते. कालौघात विविध कारणांसाठी हे पुतळे हटवण्यात आले. त्यातील काही पुतळे भायखळा येथील प्राणिसंग्रहालय परिसरातील भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या बाजूला ठेवण्यात आले. याच ठिकाणी जागतिक वारसास्थळ असलेल्या एलिफंटा बेटांवरील हत्ती, मेट्रो जंक्शन येथील ४० फुटी कारंजे तसेच काळा घोडा चौकातील किंग एडवर्ड सातवा यांचा पुतळाही ठेवण्यात आला आहे. यातील कारंज्याची डागडुजी करून व कारंज्यांची व्यवस्था पूर्ववत करून तो पुन्हा मेट्रो चौकात लावला जाणार आहे. त्याचप्रमाणे इतर शिल्पांचीही दुरुस्ती करून ते पर्यटकांसमोर मांडण्याचा विचार महापालिका करत आहे.

ब्रिटिशांनी त्यांच्या काळात अधिकाऱ्यांचे पुतळे लावले होते. आता त्यांच्याकडे कला म्हणून पाहता येईल. त्यावेळची कला, इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घेण्याची उत्सुकता शमवण्यासाठी हे पुतळे एकत्रितरीत्या प्रदर्शनासाठी लावले जातील, असे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या या पुतळ्यांची डागडुजी, दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दीडशे ते दोनशे वर्षे जुने असलेल्या या पुतळ्यांनी ऊन-पावसाचा मारा झेलला आहे. त्यामुळे त्यांना पूर्वस्थितीत आणले जाईल.

प्राणीसंग्रहालयाजवळ असलेले पुतळे

* लॉर्ड हार्डिग : १८५८ मध्ये जन्म झालेले लॉर्ड हार्डिग १९१० ते १९१६ दरम्यान भारताचे व्हाइसरॉय होते.

* एडविन मोण्टाज : १८७९ मध्ये जन्म झालेले, ब्रिटिश राज्यकर्ते असलेल्या एडविन मोण्टाज यांनी १९१७ ते १९२२ दरम्यान सेक्रेटरी ऑफ स्टेट पद सांभाळले होते.

* क्वीन व्हिक्टोरिया : १८३७ पासून ब्रिटनचे राणीपद भूषवणाऱ्या क्वीन व्हिक्टोरिया यांना १८७६ मध्ये एम्प्रेस ऑफ इंडिया पदही बहाल करण्यात आले. मुंबईच्या रेल्वे स्थानकालाही क्वीन व्हिक्टोरियांचे नाव देण्यात आले.

* डॉ. थॉमस ब्लॅनी : डॉ. ब्लॅनी यांनी मुंबईतील स्वच्छतेशी संबंधित तापाच्या आजारांची माहिती त्यांनी १८६७ मध्ये प्रसिद्ध केली. प्लेगच्या साथीचा अंदाज व तीव्रता लक्षात आलेल्या ब्लॅनी यांनी त्या काळात रुग्णसेवेचे काम केले. १८७६ ते १८९३ या काळात ते ज्युरी सदस्यही राहिले.

* सर रिचर्ड टेम्पल, फर्स्ट बॅरोनेट : १८२६ मध्ये जन्म झालेले सर रिचर्ड टेम्पल यांनी ब्रिटिश इंडियाच्या प्रशासकाचे काम पाहिले. १८७७ मध्ये ते बॉम्बे प्रेसिडन्सीचे गव्हर्नर झाले. १८८० मध्ये ते भारत सोडून जाताना त्यांचा पुतळा तयार करावा असे ठरले. संगमरवरामध्ये घडवलेला त्यांचा पुतळा ओव्हल मैदानाजवळ ठेवण्यात आला होता. १९६५ च्या दरम्यान तो राणीबागेत नेण्यात आला.

* लॉर्ड माक्र्विस ऑफ वेलस्ले: १७६० मध्ये जन्म झालेले फर्स्ट माक्र्विस वेलस्ले यांनी १७९७ मध्ये भारताच्या गव्हर्नर जनरल पदाचा कार्यभार स्वीकारला. ब्रिटिश राज्यकर्ते असलेल्या वेलस्ले यांनी वसाहतींच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले.

* लॉर्ड माक्र्विस ऑफ कॉर्नवलिस : १७३८ मध्ये जन्मलेल्या कॉर्नवलिस यांनी १८०५ मध्ये १ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबर दरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहिले.

* लॉर्ड सॅण्डहर्स्ट : जनरल विल्यम रोझ मॅन्सफिल्ड यांनी १८६५ ते १८७० या काळात भारतात सैन्यदलाचे कमांडर इन चिफ पद भुषवले.

जागा निश्चित करणार

* या सर्व पुतळ्यांसाठी जागा निश्चित झाली नसली तरी ओव्हल मैदानाशेजारी असलेल्या कूपरेज मैदानात त्यांना स्थानापन्न करण्याचा विचार सुरू झाला आहे.

* हा सर्व परिसर महानगरपालिका पुरातन वारशाच्या स्वरूपात जतन करण्याचा प्रयत्न करत आहे.

* या ठिकाणी असलेल्या बॅण्डस्टॅण्डची नुकतीच दुरुस्ती पूर्ण झाली असून, लादी तसेच छप्पर नव्याने बसवण्यात आले आहे. या जवळच हे पुतळे लावण्याबाबत चाचपणी सुरू आहे.

* ज्या हत्तीवरून एलिफंटाचे नाव पडले तो मात्र तूर्तास राणीबागेतच राहील, त्याच प्रमाणे काळा घोडय़ाच्या पुतळ्याबाबतही निर्णय होणे बाकी आहे.