साथ नियंत्रणातील अनुभवांसह अभ्यासपूर्ण माहिती

मुंबई : मुंबई महापालिके ने करोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना आणि  उपचारांसाठी विविध पातळीवर केलेले ठोस बदल यामुळे मृत्यूदर रोखण्यात आलेले यश हा जागतिक पातळीवर कौतुकाचा विषय ठरला. यातून एक प्रारूप जगासमोर उभे राहिले.

करोनासारख्या नव्या आजारावर मात करण्यासाठी चाचण्या, औषधे, इतर उपचारांचे वैद्यकीय व्यवस्थापन अभ्यासपूर्ण रितीने मांडणारे ‘प्रिन्सिपल्स ऑफ मेडिकल मॅनेजमेंट ऑफ कोविड १९’ हे पुस्तक नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. साडेसहाशे पानाच्या या पुस्तकांमध्ये पालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचे अनुभव, अभ्यास मांडले आहेत. यात करोना साथीचे मुंबईवर झालेले परिणाम, साथ नियंत्रणासाठी सुरुवातीच्या काळात पालिकेने केलेल्या उपाययोजना, करोना विषाणूचा प्रसार, उत्परिवर्तन, सौम्य ते मध्यम आणि गंभीर प्रकृतीचे, कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन, औषधांच्या परिणामकतेबाबतची निरीक्षणे, डायलिसिस तसेच गर्भवती माता आणि नवजात बालकांमधील करोना उपचार, करोनापश्चात झालेल्या इतर आजारांचे व्यवस्थापन याची माहिती दिलेली आहे. तसेच रुग्णांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करताना मोठय़ा करोना रुग्णालयांच्या उभारणीसह रुग्णवाहिकेची उपलब्धता, खाटांचे वितरण, ऑक्सिजनसह औषधांची उपलब्धता इत्यादी आव्हानांना पालिकने कसे तोंड दिले हे देखील यात मांडले आहे.

‘सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईने करोना नियंत्रणासाठी उभारलेल्या प्रारुपाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी हे प्रारुप अभ्यास म्हणून मांडण्यासाठी पालिकने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. भविष्यात अशा साथी आल्यावर कशारितीने तयारी करावी, उपचारांसाठी काय दिशा असेल याबाबत शास्त्रोक्त पद्धतीने माहिती या पुस्तकात मांडली असल्याने जागतिक पातळीवरही हे अभ्यासासाठी संदर्भ पुस्तक म्हणून वापरले जाईल’, असे या पुस्तकाचे संपादक आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.