प्रशासनाकडून पुरवठादारांना थकबाकीच्या ९५ टक्के रक्कम अदा

मुंबई  : ‘वस्तू आणि सेवा करा’च्या (जीएसटी) आकारणीवरून निर्माण झालेल्या गोंधळातून मार्ग काढत अखेर पालिकेने आपल्या रुग्णालयांच्या औषध पुरवठादारांना २२ कोटी ७८ लाख रुपये थकबाकीपैकी ९५ टक्के रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू केली. त्यामुळे पुरवठादारांनी ‘औषधबंदी’चा निर्णय मागे घेतला आहे. परिणामी पालिका रुग्णालयांत निर्माण होणारा बाका प्रसंग टळला.

गेल्या चार महिन्यांपासून पालिकेने रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना तब्बल २२ कोटी ७८ लाख रुपयांचे अधिदान केले नाही. त्यामुळे पुरवठादारांपुढे आर्थिक पेच निर्माण झाला होता. चार महिने वाट पाहिल्यानंतरही पालिकेकडून पैसे मिळण्याची शक्यता धुसर बनल्यामुळे पुरवठादारांनी रुग्णालयांना २० नोव्हेंबरपासून औषधांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात ‘पालिका रुग्णालयात औषधबंदी?’ या मथळ्याखाली १८ नोव्हेंबर रोजी ‘लोकसत्ता, मुंबई’ या सहदैनिकात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शनिवारी पालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पुरवठादारांची थकीत रक्कम देण्याचे आदेश अजोय मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जुलै महिन्यात वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीवरून पालिकेत मोठा गोंधळ उडाला. औषध पुरवठादारांचे पैसे जुलैपासून देण्यातच आले नाहीत. पुरवठादारांचे गेल्या चार महिन्यांतील तब्बल २२ कोटी ७८ लाख रुपये पालिकेने थकविले. त्याचा फटका पालिका रुग्णालयांतील रुग्णांनाही बसू लागला. पुरविलेल्या औषधांचे पैसे २० नोव्हेंबपर्यंत दिले नाहीत, तर पालिका रुग्णालयातील जीवनावश्यक औषधांचा व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा बंद करण्यात येईल जाईल, असा इशारा पुरवठादारांनी दिला होता. मात्र ‘औषधबंदी’चा इशारा देणाऱ्या पुरवठादारांना त्यांची थकलेली रक्कम देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. त्यामुळे पुरवठादारांनी ‘औषधबंदी’चा निर्णय रहित केला. पुरवठादारांच्या थकलेल्या रकमेच्या ९५ टक्के पैसे प्रशासनाने मंगळवारी दिली. त्यामुळे पुरवठादारांनी रुग्णालयांचा औषधपुरवठा सुरू ठेवला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून पालिकेच्या केईएम, नायर, शीव या प्रमुख रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे आणावयास सांगितले जात असल्याच्या तक्रारी होत्या. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मोफत औषधे मिळतील या अपेक्षेने रुग्ण पालिका रुग्णालयांची वाट धरतात. मात्र औषधपुरवठा सुरळीत झाल्यानंतर रुग्णांची औषधांसाठी होणारी वणवण थांबेल.

औषध पुरवठादारांना थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम देण्यात आली होती. वस्तू व सेवा कराच्या तांत्रिक अडचणींमुळे औषधे येण्यास अडथळा जाणवत होता. पुरवठादारांना ९५ टक्के थकबाकी देण्यात आली आहे. उरलेली थकबाकीही लवकरच देण्यात येईल.

– डॉ. अविनाश सुपे, संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये